बीड — गेवराई विधानसभा मतदारसंघात पंडितांचे “विजय” पर्व सुरू झाले आहे. तब्बल 42 हजार 390 मतांनी दणदणीत विजय त्यांनी मिळवला आहे. गेल्यावेळी ज्यांच्याकडून पराभव पत्करावा लागला ते लक्ष्मण पवार तिरंगी लढतीत यावेळी तिसऱ्या स्थानावर राहिले आहेत.
गेवराई मतदार संघ तिरंगी लढतीमुळे प्रत्येकांचे लक्ष खेचून राहिला होता. बदामराव पंडित, लक्ष्मण पवार यांच्याबरोबर लढत देताना विजयाची समीकरणं माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी सटिक मांडली होती. त्या अनुषंगाने प्रयत्न केले जात होते. नियोजनबद्ध प्रचार यंत्रणा, आज पर्यंत जनतेशी जोडलेली नाळ, विकासासाठी आजपर्यंत शिवछत्र ने दाखवलेली तळमळ या निवडणुकीत विजयसिंह पंडित यांच्या कामाला आली. विजयसिंह पंडित यांना एक लाख 16 हजार 141 मत पडली दुसऱ्या क्रमांकावर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे उमेदवार बदामराव पंडित यांना 73 हजार 751 मत मिळाली. तर गेल्या वेळी आमदार राहिलेले लक्ष्मण पवार हे यावेळी केवळ 38,171 मतं मिळवू शकले. विजयसिंह पंडित 42 हजार 390 अशा भरघोस मतांनी विजयी झाले आहेत.

