बीड — स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची मोर्चे बांधणी सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी निवडणुकीत खर्च करण्याची तयारी ठेवा ‘नुसती निवडणूक लढवायची इच्छा असून उपयोग नाही. तुमच्याकडे किती ‘दारू’गोळा आहे, याची माहिती आम्हाला द्या’
चपटी, कोंबडी, बकरे आणि लक्ष्मी दर्शन महत्त्वाचे असल्याचे म्हणत निवडणुकांच्या माध्यमातून लोकशाहीची टर उडवण्यास तयार रहा असा अप्रत्यक्ष सल्ला दिल्यामुळे खळबळ माजली आहे.
लोकशाहीची पायमल्ली करणारे आणि जनतेचा अपमान करणारे विधान आमदार प्रकाश सोळंके यांनी पक्षाच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलावण्यात आलेल्या बैठकीत केले आहे. माझ्या सगळ्या निवडणुका तुम्हीच लढवल्या आहेत निवडणुकीच्या शेवटच्या दोन दिवसात काय दारूगोळा लागतो हे तुम्हाला चांगलं माहिती आहे असे ते म्हणाले.
एवढ्यावरच ते थांबले नाहीत. चपटी, कोंबडी, बकरे आणि लक्ष्मी दर्शन देऊन तुम्ही माझ्या अनेक निवडणुका लढवल्या आहेत. तुम्ही लोक आता एक्सपर्ट झाला आहात त्यामुळे येणारी निवडणुकीत आपल्याला याचा वापर करावा लागेल. असं विधान सोळंके यांनी केल्याने संतापाची लाट उसळली आहे. एकीकडे निवडणूक आयोगावर बोगस मतदार व ईव्हीएम मशीन वरून देशभर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असताना सत्ताधारी पक्षाच्या आमदाराने निवडणूक आयोगाच्या डोळ्यात कशी धूळफेक करून निवडून आलो. याची जाहीर कबुली दिल्यामुळे विधानसभा निवडणूक काळात एवढे मोठे गैरप्रकार सुरू असताना निवडणूक आयोग काय करत होते असा प्रश्न देखील उपस्थित होऊ लागला आहे. गैरमार्गाने निवडून आलो आहोत ही आमदार प्रकाश सोळंके यांची कबुली निवडणूक आयोगाला मोठी चपराक देणारी आहे.
प्रकाश सोळंके यांनी यापूर्वी देखील अनेकदा वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. मराठा समाजाचे असल्याने त्यांना महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्रिपद नाकारण्यात आले. ओबीसी असते तर ते मंत्री झालो असते असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले होते. दरम्यान प्रकाश सोळंके यांनी पैशाचा माज दाखवत लोकशाहीची थट्टा मांडली असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

