गेवराई — घराच्या बांधकामासाठी बँकेत जमा केलेली अडीच लाख रुपयाची रक्कम काढून घेऊन जात असताना हातातली पिशवी हिसकावून घेत अज्ञात चोरट्यांनी मोटार सायकल वरून पळ काढला या घटनेने गेवराई शहरात खळबळ माजली आहे. शहरातील मुख्य रस्त्यावर दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली.
गेवराई तालुक्यातील सेलू येथील रहिवासी दादासाहेब प्रभाकर यादव हे मंगळवारी घराच्या बांधकामासाठी दुपारी स्टेट बँक ऑफ इंडियामधून 2 लाख 50 हजार रुपये काढून घेऊन जात होते. ते रस्त्याने जात असताना, त्यांच्या पाठीमागून एका स्पोर्ट्स बाइकवरून दोन जण भरधाव वेगाने आले. या दोघांपैकी पाठीमागे बसलेल्या चोरट्याने दादासाहेब यादव यांच्या हातातील पैसे असलेली पिशवी हिसकावून दोघांनी बीडच्या दिशेने सूसाट पळ काढला. भरदिवसा आणि मुख्य रस्त्यावर घडलेल्या या घटनेमुळे गोंधळ उडाला. हातातील पिशवीची चोरी होताच दादासाहेब यादव यांनी तातडीने गेवराई पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ पोलिस ठाणे हद्दीत नाकाबंदी केली आहे. बीडकडे पळून गेलेल्या चोरट्यांचा आणि त्यांच्या स्पोर्ट्स बाइकचा शोध पोलिस घेत आहेत. भरदिवसा झालेल्या या धाडसी चोरीमुळे गेवराई शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

