बीड — सध्या प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना यांसह शासनाच्या विविध घरकुल योजनेची कामे प्रशासकीय स्तरावर सुरु आहेत. या योजनेतील लाभार्थी हे गरजू आणि वंचित असतात. गरजू आणि पात्र लाभार्थ्यांचे घराचे स्वप्न पूर्ण होण्यास कसल्याही प्रकारचा अडथळा होऊ नये, तसेच या योजनांच्या प्रक्रियेत कुठल्याही स्तरावर आर्थिक मागणी अथवा इतर कसलाही गैरप्रकार होऊ नये याची पुरेपूर दक्षता घ्या. तसेच पात्र लाभार्थींना तातडीने घरकुल हप्ता वितरीत करा, असे कडक निर्देश आ.संदीप क्षीरसागर यांनी बीड नगरपालिका, बीड पंचायत समिती व शिरूर कासार पंचायत समिती व बीड नगरपालिका येथील अधिकाऱ्यांना दिले आहेत.
सध्या प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत नवीन उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. त्याबाबत ग्रामपंचायत स्तरावर सध्या प्रस्ताव दाखल करून घेणे सुरू आहे. प्रधानमंत्री आवास योजना शहरीचे ऑनलाईन अर्ज दाखल करून घेण्याची प्रक्रिया झाली आहे. रमाई आवास योजनेचे प्रस्ताव ग्रामपंचायत स्तरावरून दाखल करवून घेऊन पंचायत समितीमार्फत समाजकल्याण विभागाकडे दाखल करण्यात आले आहेत तसेच त्रुटी असलेले प्रस्तावांची पुर्तता करणे सुरू आहे.
बर्याचवेळा या योजनेतील लाभार्थ्यांकडून अधिकारी आर्थिक मागणी करत असल्याच्या तक्रारी येत असतात. जे नागरिक या योजनेचे लाभार्थी आहेत ते सर्व अतिसर्वसामान्य, गरीब आणि वंचित घटकातील असतात. त्यांची अडवणूक करणे, आर्थिक मागणी करणे किंवा इतर कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार या योजनेच्या कार्यवाहीत होता कामा नये. तसेच जे लाभार्थी पात्र आहेत त्यांचे हप्ते तातडीने वितरीत करा अशाप्रकारचे कडक निर्देश आ.संदीप क्षीरसागर यांनी बीड व शिरूर कासार तालुक्याचे गटविकास अधिकारी, बीड नगरपालिकेचे मुख्याधिकारी तसेच इतर संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
बोगसगिरी आणि लाभार्थ्यांची पिळवणूक अजिबात खपवून घेणार नाही
दरम्यान, घरकूल योजनेचा लाभ घेऊन घर न बांधताच अधिकार्यांच्या संगनमताने रक्कम उचलल्याचे गैरप्रकार जिल्ह्यात समोर आले आहेत. असले प्रकार बीड विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात अजिबात खपवून घेणार नाही. त्यासोबतच लाभार्थ्यांची अधिकार्यांकडून होणारी आर्थिक पिळवणूकही सहन केली जाणार नाही. अशी तंबीही आ.संदीप क्षीरसागरांनी अधिकार्यांना दिली आहे.
बीड तालुक्याने विशेष लक्ष देण्याची गरज, दिरंगाई चालणार नाही
घरकुलाचा पहिला हप्ता सोडविण्यात बीड तालुका मागे पडला आहे. बीड पंचायत समिती अंतर्गत एकूण २९२९ लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरीत करण्यात आलेला नाही. त्यामुळे बीड पंचायत समितीने विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. याबाबतीत दिरंगाई चालणार नाही. यासोबतच घरकूल संदर्भात बीड नगरपालिकेच्याही अनेक तक्रारी नागरिकांमधून होत आहेत. त्याची तातडीने सोडवणू प्रशासनाने करावी. असेही आ.संदीप क्षीरसागर यांनी म्हटले आहे.

