बीड — अमानुष मारहाण तसेच वन्य प्राण्यांच्या शिकारी सारख्या गुन्ह्यातून न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आलेल्या खोक्या उर्फ सतीश भोसले ला व्हीआयपी ट्रीटमेंट भेटत आहे. न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यापूर्वी कारागृह आवारात जेवणाचा आस्वाद घेत कार्यकर्त्यांशी गप्पा मारत असतानाचा व्हिडिओ समोर आला आहे यामुळे खळबळ माजली आहे. एकूणच बीड पोलिस प्रशासनाची इभ्रत वेशीला टांगली गेली आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी वाल्मीक कराडला जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्यावरून राज्यात खळबळ माजली होती. त्यावेळी धनंजय मुंडे यांच्यावर देखील टीका करण्यात आली होती. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील ट्विट करून गंभीर प्रश्न उपस्थित केले होते.
मात्र सुरेश धस यांचा कार्यकर्ता असलेल्या सतीश भोसले उर्फ खोक्या याला देखील पोलिस प्रशासन व्हीआयपी ट्रीटमेंट देऊ लागलं आहे. सतीश भोसलेला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश शिरूर न्यायालयाने दिले आहेत.बीडच्या जिल्हा कारागृहात रवानगी करत असताना राजा महाराजांना शोभेल अशी खोक्याची बडदास्त जेलच्या आवारात ठेवली गेली असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. कारागृहाच्या बाहेर कार्यकर्त्यांसोबत मस्त राव रंभाच्या गप्पा मारत आलेल्या डब्यावर ताव मारताना या व्हिडिओत खोक्या दिसत आहे. त्याच्या दिमतीला पोलीस यंत्रणादेखील आहे. कार्यकर्त्यांसमोर बसून आलेल्या डब्यातील जेवणाचा आनंद त्याने घेतला. कार्यकर्त्यांनी त्याचे हात धुण्यासाठी पाणी ओतले त्यानंतर तो भेटायला आलेल्या लहान मुलीसह महिलांना बोलत असल्याचं या व्हिडिओतून दिसत आहे. पोलिसांसह जिल्हा प्रशासनाची अशा समोर येत असलेल्या व्हिडिओमुळे नाचक्की झाली असून जेल व पोलीस प्रशासन कधी सुधारणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

