केज — ऊसतोड कामगाराच्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीच अपहरण करून मुलीच्या वडिलालाच तुमची मुलगी माझ्यासोबत आहे असं सांगितलं. या घटनेने खळबळ माजली आहे.
एका खेडेगावातील अल्पवयीन मुलीचे वडील ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनावर चालक म्हणून काम करतात. शनिवार, दि. 1 नोव्हेंबर रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही 15 वर्षीय मुलगी बेपत्ता झाली. मुलीच्या आई-वडिलांनी रात्री उशिरापर्यंत सर्व नातेवाईकांकडे तिचा शोध घेतला, पण ती कुठेही आढळली नाही.दरम्यान
रविवार, दि.2 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास मुलीचे वडील केज येथे पाहुण्यांकडे मुलीचा शोध घेत असतानाच, गावातील ऊसतोड मजुरीचे काम करणाऱ्या अविवाहित तरुणाने त्यांना त्यांच्या मोबाईलवर कॉल केला. आरोपीने अत्यंत बेधडकपणे सांगितले, “तुमची मुलगी माझ्यासोबत आहे!” यावर मुलीच्या पित्याने घाबरून, “गुपचूप माझ्या मुलीला घरी आणून सोड,” अशी विनवणी केली. मात्र, आरोपी तरुणाने मुलीला कुटुंबाच्या ताब्यात देण्यास नकार दिला. या घटनेमुळे मुलीच्या वडिलांनी तातडीने रविवारी (दि. २) केज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या आरोपी तरुणाविरुद्ध केज पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक उमेश निकम हे अल्पवयीन मुलीचा आणि आरोपी तरुणाचा शोध घेत आहेत

