Sunday, December 14, 2025

केंद्रीय मंत्र्याची मुलगी सुरक्षित नसेल तर इतरांचे काय ? रक्षा खडसे यांचा सरकारला घरचा आहेर; छेडछाड करणारे आरोपी मोकाट

जळगाव — केंद्रीय मंत्र्याची मुलगी सुरक्षित नसेल तर इतरांचे काय, असा प्रश्न उपस्थित करुन केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी राज्यातील बिघडलेल्या कायदा सुव्यवस्था परिस्थितीवरुन राज्य सरकारला घरचा आहेर दिला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन महिलांच्या सुरक्षेसाठी असलेल्या कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याची मागणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दुसरीकडे, मुक्ताईनगर छेडछाड प्रकरणातील संशयितांविरुध्द गुन्हा दाखल झाला असला तरी रविवारी सायंकाळपर्यंत कोणालाही अटक झालेली नाही.

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे सुरू असलेल्या यात्रेत काही टवाळखोरांनी तरुणांनी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह अन्य तरुणींची छेड काढल्यानंतर सुरक्षा रक्षकाच्या तक्रारीवरून संशयितांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, स्वतः मंत्री खडसे यांनी रविवारी पोलीस ठाणे गाठून दोषींवर कायदेशीर कारवाईची मागणी केली.

मुक्ताईनगर येथील यात्रेत काही टवाळखोरांनी रक्षा खडसे यांच्या मुलीसह अन्य मुलींची शुक्रवारी रात्री छेड काढली. मुलींबरोबर असलेल्या सुरक्षारक्षकाने टवाळखोरांना अडवण्याचा प्रयत्न केला असता सुरक्षा रक्षकालाही धक्काबुक्की करण्यात आली.

छेडछाड प्रकरणी सुरक्षा रक्षकाच्या तक्रारीवरून संशयितांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु, छेडछाड करणाऱ्या तरुणांना अटक न झाल्याने मंत्री रक्षा खडसे रविवारी आक्रमक झाल्या. संशयितांना तत्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी रविवारी त्यांनी मुक्ताईनगर पोलीस ठाणे गाठले. टवाळखोरांनी छेड काढलेल्यांमध्ये काही अल्पवयीन मुलींचाही समावेश आहे. केंद्रीय मंत्री म्हणून नाही तर आई म्हणून न्याय मागण्यासाठी पोलीस ठाण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

अनिकेत भोई, पियुष मोरे, सोहम कोळी, अनुज पाटील, किरण माळी अशी संशयितांची नावे आहेत. सर्वांवर पोक्सो कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पैकी अनिकेत भोई याच्यावर यापूर्वी विविध कलमांखाली चार गुन्हे दाखल आहेत. रविवारी सायंकाळपर्यंत एकाही संशयिताला अटक झालेली नाही, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी दिली

गुंडगिरीला स्थानिक राजाश्रय कारणीभूत -एकनाथ खडसे

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर मतदारसंघात अलीकडच्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात गुंडगिरी वाढली आहे. त्यास स्थानिक लोकप्रतिनिधींचा राजाश्रय कारणीभूत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे (शरद पवार) नेते आमदार एकनाथ खडसे यांनी केला आहे. मुलींच्या छेडखानीचा मुद्दा हा केवळ आपल्या घरचा नसून, व्यापक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles