बीड — सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील संशयितांवरील आरोप निश्चितीवर 12 डिसेंबरला होणाऱ्या सुनावणीत निर्णय होण्याची शक्यता आहे. गुरुवार दि. 27 नोव्हेंबर रोजी विशेष मकोका न्यायालयात संशयित विष्णू चाटे याच्या जामीन अर्जावर सरकारी पक्षाकडून युक्तिवाद करण्यात आला. घटनेतील फरारी कृष्णा आंधळे सापडत नाही याबाबतचा अहवाल सादर करण्याच्या सूचनादेखील तपास यंत्रणांना विशेष मकोका न्यायालयाने दिल्या.
संतोष देशमुख यांची गेल्या वर्षी 9 डिसेंबरला अपहरण करुन हत्या करण्यात आली. या प्रकरणी विशेष तपास पथकाने वाल्मीक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले, जयराम चाटे, प्रतीक घुले, महेश केदार आणि कृष्णा आंधळे यांच्यावर अपहरण, खंडणी आणि हत्येचा ठपका ठेवला. या प्रकरणाची सुनावणी येथील विशेष मकोका न्यायाधीश व्यंकटेश पटवदकर यांच्या न्यायालयात सुरू आहे. मात्र, घटनेला वर्ष लोटत आले तरी यातील कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे.गुरुवारी झालेल्या सुनावणीत विशेष सहायक सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांनी विष्णू चाटे याचा या प्रकरणात कसा सहभाग आहे, याबाबतचे पुरावे न्यायालयासमोर आणले. यावेळी या प्रकरणातील संशयित कृष्णा आंधळे अद्यापही फरार असल्याच्या मुद्द्यावर न्यायालयाने लक्ष वेधत तपास यंत्रणांकडे याबाबतची विचारणा करून तो का सापडत नाही, याबाबतचा अहवाल सादर करावा, अशा सूचना केल्या. तसेच पुढील सुनावणी 12 डिसेंबरला होणार असून, या दिवशी आरोप निश्चिती करून सुनावणी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

