गेवराई — किराण्याची उधारी मागितल्याच्या कारणावरून दुकानदाराला धारदार शास्त्राने मारहाण केल्याची घटना बंगालीपिंपळा गावात घडली. याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी दुकानदार याच्यावर बीडच्या शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
बंगाली पिंपळा दादासाहेब बबनराव तळतकर हे रविवारी सकाळी साडेआठ सुमारास आपल्या किराणा दुकानात असताना सिद्धार्थ बंडु माने हा तेथे आला. त्याने पाण्याची बाटली मागितली असता दुकानदार तळतकर यांनी ‘तुझ्या चुलत्याकडे माझी 900 रुपयांची उधारी आहे, ती आधी जमा कर.’ असे म्हणताच सिद्धार्थ माने संतापला.त्याने दुकानदार तळतकर यांना शिवीगाळ करून दुकानाबाहेर खेचले व चापट मारली. इतक्यात त्याचा चुलता सुधीर माने हा हातात धारदार `कत्ती घेऊन आला. दादासाहेब तळतकर यांच्या मानेवर व कानामागे कत्तीने वार करून गंभीर दुखापत केली.या वेळी तळतकर यांचा भाऊ गणेश तळतकर याने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता त्याच्याही उजवा हातावर कत्तीचा वार करून जखमी केले. भगवान माने याने लाकडी काठीने तळतकरच्या पाठीवर मारहाण केली, तर मधुकर (बंडु) माने हा लोखंडी कोयता घेऊन आला आणि शिवीगाळ करू लागला.गावातील काही नागरिकांनी मध्यस्थी करून दुकानदार तळतकर व त्याचा भाऊ यांना सोडवले. जखमींना तातडीने बीड येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी सिद्धार्थ बंडु माने, सुधीर भगवान माने, भगवान बापुराव माने आणि मधुकर उर्फ बंडू माने सर्व रा. बंगाली पिंपळा यांच्याविरुद्ध चकलांबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.

