परळी — पोलिसांनी जारी केलेल्या क्यू आर कोड च्या माध्यमातून मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी मारलेल्या छाप्यात 13 लाख 50 हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला. ही कारवाई परळी तालुक्यातील धर्मापुरी येथे परळी ग्रामीण पोलिसांनी बुधवारी दुपारी केली.
धर्मापुरी येथील एका किराणा दुकानात गुटखा विक्री चालू असल्याची माहिती परळी ग्रामीणचे पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलीस निरीक्षक मजहर सय्यद, सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान कवडे, पोलीस उपनिरीक्षक रियाज शेख लाल, निमोणे, विष्णू घुगे, पांडुरंग वाले ,गोविंद बडे सुनील अन्नमवार यांची दोन पथक तयार करण्यात आले.12 फेब्रुवारी रोजी दुपारी सोमनाथ अशोक फड, बाबुराव श्रीपती मुसळे यांच्या किराणा दुकान तसेच घरावर छापा टाकला. यावेळी शासनाची बंदी असलेला गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ येथे आढळून आले. याची किंमत अंदाजे 13 लाख 50 हजार रुपये आहे. हा सर्व गुटखा परळी ग्रामीण पोलिसांनी जप्त केला आहे. गुटख्याची अवैध विक्री करणाऱ्या दोघांवर परळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होणार असल्याचे एका पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. पोलिस अधीक्षकांनी सुरू केलेल्या संवाद प्रकल्प ॲप वरून मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई केली. दरम्यान जास्तीत जास्त जनतेने या संवाद प्रकल्प ॲपचा वापर करून गोपनीय माहिती द्यावी जेणेकरून कारवाई करणे सोपे जाईल. माहिती देणाऱ्या व्यक्तीची माहिती गुप्त ठेवण्यात येईल असे आवाहन पोलीस विभागातर्फे करण्यात आले आहे

