मुंबई — राज्यातील शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीन अनुदान देणार असल्याची घोषणा केली असली तरी सरकार कडून टोलवा टोलवीचा खेळ सुरू आहे. मात्र ही प्रतीक्षा आता संपणार आहे. सोमवारी दि. 30 सप्टेंबर रोजी कापूस आणि सोयाबीनचे अनुदान दिले जाणार असल्याची ग्वाही कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.
तसेच मुंडे यांनी, सोमवारीच कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना १० हजार दिले जातील, असेही म्हटले आहे. तर याचा फायदा सुमारे ६५ लाख कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना होईल असा दावाही मुंडे यांनी केला आहे.
राज्य सरकाराच्या कृषी विभागाकडून रविवारी २०२०, २०२१ आणि २०२२ सालातील कृषी पुरस्कारांचे वाटप करण्यात आले. कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी आणि अधिकाऱ्यांचा सत्कार व पुरस्कार देऊन सी.पी. राधाकृष्णन यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री दादा भुसे, मंत्री दीपक केसरकरांसह कृषी विभागाचे अधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते. यावेळी मुंडे यांनी कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानावरून भाष्य केले.यावेळी मुंडे यांनी राज्यातील सुमारे ९६ लाख कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांपैकी ६८ लाख शेतकऱ्यांनी आधार लिंक केले आहे. या ६८ लाख शेतकऱ्यांनाच अनुदान मंजूर केले जाईल. प्रतिहेक्टरी ५ हजार २ हेक्टरच्या मर्यादेत जास्तीत जास्त १० हजार रुपये अनुदान मंजूर करण्यात येईल. राज्यातील ६५ लाख शेतकऱ्यांमध्ये २ हजार ५०० कोटींचे वितरण सोमवारी केले जाणार असल्याचेही मुंडे यांनी सांगितले आहे.यावेळी मुंडे म्हणाले, शेतकर्यांच्या आनंदात आपला आनंद असून आपण मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानतो. कारण त्यांनी कमी वयात आपल्याला कृषिमंत्र्यालयाची जबाबदारी दिली. यामुळेच आज शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आखता आल्या. तर शेतकऱ्यांच्या कष्टामुळेच आपले राज्य देशात चांगले कृषि राज्य बनल्याची प्रतिक्रिया मुंडे यांनी व्यक्त केली.

