Sunday, December 14, 2025

काकूंचा लोकसेवेचा वारसा डॉ. योगेश क्षीरसागरकडे सोपवला ; त्याला विजयी करा –जयदत्त क्षीरसागर

बीड — काकूंच्या मार्गदर्शनाखाली राजकारणात पाऊल ठेवले आणि आयुष्यभर लोकसेवेचा वसा अखंडपणे चालविला. कधीही काकूच्या नावाला गालबोट लागेल असे काम केले नाही. जनतेचे प्रेम आणि आशीर्वाद मिळवून लोकसेवा केली, असे सांगत माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी ‘आता हा लोकसेवेचा वारसा डॉ.योगेश क्षीरसागर यांच्याकडे सोपवत आहे’ असे जाहीर केले. सर्व जात-पात, धर्म, गट-तट, आपसातील मतभेद बाजूला ठेवून विधानसभा निवडणुकीत डॉ.योगेश क्षीरसागर यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन त्यांनी केले.

बीड विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ नवगण राजुरी येथे रविवारी (दि.१७) आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी ह.भ.प.अमृत महाराज जोशी, ज्येष्ठ नेते रवींद्र क्षीरसागर, प्रा.जगदीश काळे, दिनकर कदम, नानासाहेब काकडे, माजी उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर, अशोक हिंगे, विलास बडगे, रामचंद्र बहिर, सखाराम मस्के, मंदाताई गायकवाड यांच्यासह राजुरी ग्रामस्थ, युवक, युवती जेष्ठ नागरिक व महिला यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

पुढे बोलताना जयदत्त क्षीरसागर म्हणाले की, सत्ता हे परिवर्तनाचे साधन आहे. आम्ही विना मोबदला घरपोच सेवा देणारी माणसं आहोत. आपला सालकरी कसा असावा हे ठरवण्याची जबाबदारी मतदारांची आहे. येत्या २३ तारखेला विजयाचा गुलाल उधळण्यासाठी घड्याळाच्या चिन्हासमोरील बटण दाबून डॉ. योगेश क्षीरसागर यांना आपण प्रचंड बहुमताने निवडून द्यावे. प्रत्येकाने गावोगावी जाऊन मतदान करून घ्यावे. आपला गाव, परिसर व मित्रमंडळी यांना जागृत करून मतदान केंद्रापर्यंत आणावे, आहे त्या साधनासह गट, तट बाजूला ठेवून डॉ.योगेश क्षीरसागर यांना विजयी करावे असे आवाहन जयदत्त क्षीरसागर यांनी यावेळी केले. यावेळी डॉ.योगेश क्षीरसागर म्हणाले, १५ वर्षांपूर्वीचे क्षीरसागर घराण्याचे वैभव पुन्हा राजुरीला प्राप्त करून देण्यासाठी, आणि काकूंचा वसा चालवण्यासाठी, मला तुमचे मतदान रुपी आशीर्वाद हवे आहेत. राजुरीकडे जायकवाडीच्या कालव्याचे पाणी आणण्याचे प्राथमिक प्राधान्य असेल आणि राजुरी सर्कलचा विकास पुन्हा सुरू करेन. माजी उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांनी देखील मनोगत व्यक्त करून डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले. यावेळी दिलीप आहेर, मुकेश भोकरे, निलेश जगताप, गणेश जावळे, अशोक सोळुंके, विष्णू जाधव, शेषनारायण कोळेकर, पांडुरंग भोसकर, प्रा.सुदाम नवले, धनंजय जगताप, विश्‍वास आखाडे, सुरेश काशिद, राजाभाऊ सोळुंके, हनुमान जगताप, मारूती वाघ, बाबूराव जमदाडे, परमेश्‍वर सपकाळ, भाऊसाहेब जानवळे, जयराम गिते यांच्यासह परिसरातील कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिलीप आहेर यांनी केले. सुत्रसंचालन नितीन गायकवाड यांनी केले. शेवटी अ‍ॅड.सदाशिव राहिंज यांनी उपस्थितांचे आभार मानले.

आमदाराने पैसे गोळा करण्यापलिकडे दुसरे कुठले काम केले नाही -रविंद्र क्षीरसागर

ज्येष्ठ नेते रविंद्र क्षीरसागर म्हणाले की, मागच्या वेळी मी राजुरी सर्कलमधील मतदारांना, माझ्या झोळीत माप टाका असे म्हणालो होतो. परंतु आता माझीच झोळी फाटली आहे. ज्याने मला घराबाहेर काढले, माझ्यावर अन्याय केला, जो व्यक्ती बापावर एवढा अन्याय करतो, तो जनतेवर किती अन्याय करत असेल याचा अनुभव तुम्ही घेतला आहे. या आमदाराने ५ वर्ष टक्केवारीच्या माध्यमातून पैसे गोळा करण्यापलिकडे दुसरे कुठले काम केलं नाही. फक्त आपली दुकानदारी सुरू ठेवली. त्यामुळे काकू आणि अण्णांचा लोकसेवेचा वसा योगेशमध्ये आहे, आता त्याला आपला पाठिंबा द्या, असे आवाहन त्यांनी केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles