मावेजा मागणाऱ्या बेडूकवाडीच्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल
बीड — दोन दशकापूर्वी काय राव तुम्ही..! धोतराच्या धंद्यात भरपूर कमावलं….!… नादात … गमावलं असं गाणं महाराष्ट्रात धुमाकूळ घालत होतं. या गाण्यासारखीच स्थिती पोलीस अधीक्षक व पवन ऊर्जा कंपन्या यांच्या बाबतीत झाली आहे. पोलीस दलाला शिस्त लावत वेगवेगळे प्रयोग करून कायद्याचा धाक निर्माण करण्यासाठी केलेल्या प्रयत्नाने नवनीत कांवत यांनी महाराष्ट्रात नाव कमवलं. पण पवनचक्क्या कंपन्यांच्या नादी लागून सशुल्क पोलीस संरक्षण देण्याच्या नावाखाली त्यांच्याच कर्मचाऱ्यांनी रजाकारी राजवट ग्रामीण भागात लागू केली. पवनचक्की कंपन्यांच्या गुंडांना संरक्षण द्यायचं, बळजबरी जमिनीवर कब्जा करायचा, शेतकरी धमकवायचा, वेळप्रसंगी पोलीस ठाण्यात नेऊन डांबून टाकायचा, आज तर शेतकरी पिता पुत्रावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यापर्यंत मजल गेली. रजाकारी चित्र निर्माण झाल्याने राज्य कायद्याचं की रजाकारांचं असा प्रश्न निर्माण झाला आहे.
जिल्हाधिकारी दावणीला; काय करायचय ते करा गाडे च्या माजाने पा”ठका”चे पितळ उघडे ✒️भाग –5
( ज्या गाडे नावाच्या कर्मचाऱ्याने शेतकऱ्यावर गुन्हा दाखल केला त्याच्या विरोधात केलेल्या बातमीची दखल देखील पोलीस अधीक्षकांनी घेतली नाही)
पवनचक्की कंपन्यांनी जिल्ह्यात पाय ठेवताच शेतकऱ्यांचे ग्रह फिरले गेले. जिल्ह्यातली बिघडली गेलेली कायदा सुव्यवस्थेची घडी व्यवस्थित बसवण्याची जबाबदारी कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक म्हणून नवनीत कांवत यांच्यावर सोपवण्यात आली. ती घडी बसवण्यासाठी हर संभव प्रयत्न त्यांनी केले. त्यांचे अनेक निर्णय वाखाणले गेले. प्रामाणिक कर्तव्यदक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणे सोपे नसले तरी त्या प्रमाणात त्यांचीच यंत्रणा साथ देत नसल्याचे चित्र अनेक वेळा पाहायला मिळालं. पवनचक्की कंपन्यांना सशुल्क संरक्षण देण्याच्या नावाखाली उच्छाद मांडला गेला. पोलिसांकडून शेतकऱ्यांना धमकावण्याचे प्रकार अनेक वेळा समोर आले. संरक्षण देताना कंपनीच्या गुंडांनाही ते दिले गेले. आपल्या माणसावर पूर्ण विश्वास नवनीत कांवत यांनी ठेवला. कायम त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले. इथेच सगळा घात झाला. कंपनीने इंग्रजांचे फोडा,तोडा राज्य करा या नीतीचा वापर करून पोलीस यंत्रणेचे अधिकारी आपलेसे करून घेतले. कंपनीच्या गुंडांसोबत पोलिसांनी ही दादागिरी केली. मावेजा मागणाऱ्या शेतकऱ्यांना गुन्हे दाखल करण्याचा धमक्या दिल्या गेल्या. धमक्यांनाही न घाबरणाऱ्या शेतकऱ्यांना सराईत गुन्हेगारासारखे पकडून पोलीस ठाण्याला नेऊन डांबून ठेवण्याचे प्रकार घडले. कंपन्यांनी अक्षरशः पोलिसांच्या मदतीने शेतकऱ्यांच्या जमिनीवर दरोडे घातले. उभी पिक वाहनांच्या मदतीने नष्ट केली. शेतकऱ्यांच्या परवानगीशिवाय जमिनीवर कब्जे केले. वेळप्रसंगी कायदा धाब्यावर बसवून पोलीस यंत्रणेने काम केले. याची ओरड प्रसार माध्यमांनी केली. मात्र प्रसारमाध्यम अतिशयोक्ती करतात या भ्रमात त्याची दखल पोलीस अधीक्षकांनी कधी घेतलीच नाही. त्यामुळे संबंधित ठाणे प्रमुख व त्यांचे कर्मचारी यांचे मनोबल वाढत गेले. या सर्व प्रकारात मात्र शेतकरी भरडला गेला. महसूल विभाग तर दावणीलाच बांधला गेला. जिल्हाधिकाऱ्यांवर दलाल म्हणून आरोप केला गेला. एवढं मोठं वस्त्रहरण होत असताना कावत यांनी मात्र सुधारणा करण्यासाठी कुठलेही पाऊल उचललं नाही. इतकंच नाही तर शेतकऱ्यांची बाजू ऐकून घ्यावी असं निवेदन देण्यात आलं होतं. ती बाजू ऐकून घेण्याची तसदी घेण्याची गरज पोलीस अधीक्षकांना वाटली नाही. प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या तरी त्याची दखल घेतली नाही. बऱ्याच वेळा हा विषय महसूलचा आहे म्हणून जबाबदारी झटकण्याचं काम केलं गेलं.परिणामी रजाकारी जमान्याचा अनुभव शेतकऱ्यांना आला गेला. निजामाकडे देखील कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम रजाकरांकडेच होतं. हा इतिहास पुन्हा नव्या रुपाने समोर आला.
रविवारी तर या सर्व प्रकाराची हद्द गाठल्या गेली. पाटोदा तालुक्यातील दासखेड ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत बेडूकवाडी येथील शेतकरी शिवाजी बाजीराव शिंदे व त्यांचा मुलगा बालाजी शिंदे या धोका पिता पुत्रांनी मावेजा मिळावा यासाठी कंपनी कर्मचाऱ्यांना शेतात का आले म्हणून जाब विचारला. पोलीस त्यांची मग काय ? या दोघा बाप लेकावर गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे गुन्ह्याचं समर्थन करताना पोलिसांनी याची शहानिशा केली असं पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून सांगण्यात आलं. शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास कंपनीचे बंदूकधारी कर्मचारी, त्यांनी पाळलेले गुंड, कामगार, जेसीबी सारख्या यंत्रणेला दोघाच जणांनी अडवलं हे बुद्धीला पटणार आहे काय? बाकीच्यांचा द्या हो सोडून आयपीएस अधिकाऱ्याला देखील सारासार विचार विवेक बुद्धीला हे पटतं का? असा प्रश्न देखील विचारला जात आहे. कंपनीचे लोक शेतकऱ्याला खंडणीचा गुन्हा दाखल करूत म्हणून धमकावत होते धक्काबुकी करत होते. त्यावेळी संरक्षण देणारे पोलीस बघ्याची भूमिका का घेत होते हा प्रश्न शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे. हा सर्व प्रकार म्हणजे ” उलटा चोर कोतवाल को डांटे” असं म्हणण्यासारखा आहे.
पवनचक्की कंपनीचा कर्मचारी मोहन रामा गाडे याच्या तक्रारीवरून कलम 115 (2), 126 (2), 308 (2), 308 (3) (5) अन्वये कामाला विरोध करणे जाणीवपूर्वक हत्येचा प्रयत्न करणे या अंतर्गत शिवाजी शिंदे व बालाजी शिंदे तसेच जेसीबी ऑपरेटर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे मात्र पोलीस अधीक्षक कायदा सुव्यवस्थेचे हाकाटी किती जरी मारत असले तरी शेतकरी मात्र पवनचक्की कंपनींना साथ देऊन भरडून काढण्याचं काम करत आहेत. पोलीस यंत्रणेची प्रतिमा जिल्ह्यातील पवनचक्की बाधित शेतकऱ्यांमध्ये काय झाली आहे याचा आढावा एकदा पोलीस अधीक्षकांनी आवर्जून घ्यावा. म्हणजे प्रतिमा सकारात्मक झाली की नकारात्मक हे कळेल.
या सर्व घटना घडामोडीमुळे मात्र कांवत साहेब…! बीडमध्ये येऊन भरपूर नाव कमावलं; पवनचक्की कंपनीच्या नादात सगळंच गमावलं असं शेतकरी म्हणू लागले आहेत .

