मुंबई — राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते नरहरी झिरवाळ यांचा एका तृतीयपंथीयासोबतचा कथित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.या प्रकरणावरून विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी केली असून, आता यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण भाष्य केले आहे.

या प्रकरणावर भाष्य करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सोशल मीडियावर समोर आलेले हे व्हिडीओ अतिशय गंभीर स्वरूपाचे आहेत. जर हे व्हिडीओ खरे असल्याचे तपासात निष्पन्न झाले, तर संबंधित व्यक्तीवर योग्य ती कायदेशीर कारवाई निश्चितपणे केली जाईल. मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले की, कायद्यासमोर कोणीही मोठा नसून सत्यता पडताळणे ही प्राथमिक गरज आहे.
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नरहरी झिरवाळ यांनी स्वतः मुख्यमंत्री फडणवीस यांना फोन करून आपली बाजू मांडली. झिरवाळ यांच्या मते, हा व्हिडीओ पूर्णतः बनावट असून तीन-चार वेगवेगळ्या क्लिप्स एकत्र करून (मॉर्फ) तो तयार करण्यात आला आहे.
आपली प्रतिमा मलीन करण्यासाठी हा कट रचल्याचा दावा त्यांनी केला आहे. यावर मुख्यमंत्र्यांनी त्यांना तत्काळ सायबर पोलिसांकडे अधिकृत तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला आहे, जेणेकरून तांत्रिक तपासातून दुध का दुध आणि पाणी का पाणी होईल.
काही दिवसांपूर्वीच झिरवाळ यांच्या कार्यालयातील क्लर्क लाचखोरीच्या प्रकरणात अडकला होता. त्यातून सावरत असतानाच आता या वैयक्तिक स्वरूपाच्या कथित व्हिडीओमुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री, सुनेत्रा पवार आणि पक्षाचे इतर वरिष्ठ नेते मिळून झिरवाळ यांच्या राजकीय भविष्याबाबत योग्य तो निर्णय घेतील, असेही फडणवीस यांनी नमूद केले. सध्या या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून, हा व्हिडीओ हनी ट्रॅपचा भाग आहे की राजकीय षडयंत्र, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल

