पाटोदा — एकीकडे पाटोदा पोलिसांनी पवन ऊर्जा कंपन्यांसाठी शेतकऱ्यांना डांबून ठेवले तर दुसरीकडे जग महिला दिन साजरा करत असताना उद्धव गडकर नावाच्या पोलीस कर्मचाऱ्यांने महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडल्याने खळबळ माजली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पाटोदा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनेच तक्रार देण्यासाठी आलेल्या महिलेची ओळख करत बलात्कार केल्याची घटना घडली. उद्धव गडकर असे या नराधम आरोपी पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे या प्रकरणात आज पाटोदा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
सामान्य नागरिकांचं संरक्षण करण्याची ज्याच्यावर जबाबदारी असते तो पोलीस खात्यातील कर्मचारीच भक्षक बनल्याने मोठी खळबळ उडाली आहे. कालच पाटोदा पोलिसांनी मावेजा मिळावा अशी मागणी पवन ऊर्जा कंपनी कडे केली असताना त्यांच्या मुसक्या बांधून रात्रभर ठाण्यात डांबून ठेवले.पोलिसांचा वचक कमी होत चालला असला तरी महिला व शेतकरी सध्या भरडून निघत असल्याचे दिसत आहे. काही प्रकरणांत पोलिसांचीच गुन्हेगारांसोबत उठ-बस असते, त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये प्रतिमा मलीन होत चालली आहे. त्यातच आता हा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये संतप्त भावना व्यक्त होत आहेत.
कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघू लागले!
पवन ऊर्जा कंपन्यांनी पाळलेले गुंड शेतकऱ्यांना अरेरावी करून धमकावत आहेत. शेतकऱ्यावर अन्याय अत्याचार होत असताना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडूनच कंपन्यांना पाठबळ दिले जात आहे. एकीकडे कंपन्यांचे गुंड तर दुसरीकडे वाढत्या गुन्हेगारीमूळे पोलीस यंत्रणेचे धिंडवडे निघू लागले आहेत. सर्वसामान्य जनतेचे सुरक्षितता धोक्यात असताना पोलिसांकडूनच महिलांवर अत्याचार होत असतील तर बीडची परिस्थिती अजूनही जैसे थेच असल्याचं बोललं जाऊ लागला आहे.

