कंपन्यांच्या नित “नव” दादागिरीने शेतकरी मात्र कावत (संताप) आहे ?

बीड — पाऊल ठेवताच पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी पवन ऊर्जा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. बिनधास्त काम करा मी तुमच्या पाठीशी आहे असं म्हणत दिल जमाई केली. मात्र पवन ऊर्जा कंपन्यांनी याचाच गैरफायदा घेत मोगलाई सुरू झाल्याचं चित्र उभं केलं. उभी पिक उध्वस्त करत शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा सपाटा लावला. पण प्रामाणिकपणे काम करणारे अधिकारी म्हणून गाजावाजा करून घेणारे एस पी कावत यांनी शेतकऱ्यांची बाजू मागणी करूनही ऐकून घेण्याची तसदी घेतली नाही किंवा त्यांना गरजही वाटली नाही. ते कंपन्यांच्या संरक्षणासाठी आले आहेत की सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी जिल्ह्यात आले आहेत असा प्रश्न मात्र निर्माण होऊ लागला आहे.

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर हा प्रश्न राज्यातच नव्हे तर देशभरात गाजला. त्यातूनच प्रामाणिक व कर्तव्यदक्ष अधिकारी जनतेला न्याय देईल यासाठी नवनीत कावत यांच्याकडे जिल्ह्याची सूत्र दिली. बीडमध्ये पाऊल ठेवताच मी आधी पूर्ण अभ्यास करून नंतरच पावलं उचलेल कायद्याचं राज्य स्थापन करेल अस आश्वासन दिलं. त्या अनुषंगाने पावलंही उचलली. वाळू तस्करी ला आळा घालण्यासाठी जेसीबी, ट्रॅक्टर, हायवा यांच्यावर मोलमजुरी करणारी पण गुन्हे दाखल असणारी मंडळी एसपी कार्यालयात बोलावून दम भरला गेला. तीच स्थिती गुटखा माफीयांच्या बाबतीत देखील आहे.

गुटखा विक्री करणाऱ्या टपऱ्यावर कारवाई करण्यात आली पण गुटखा माफियांच्या तस्करीला आळा घालण्यात सपशेल यंत्रणा फेल ठरली. त्यामुळे गुटखा विक्री अजूनही जिल्ह्यात सुरूच आहे. चिल्लर चालर गुन्हेगारांना बोलावून देखील यापुढे गुन्हे केले तर याद राखा अशी तंबी दिली. पण गुन्हे घडवून आणणाऱ्या मास्टर माईंड अद्याप एकही पोलिसांच्या हाती सापडला नाही किंवा तशी ठोस कारवाई. केली गेली नाही. पोलीस दलातच अनेक जण वाळू तस्करीत गुंतलेले आहेत. ते तस्कर सापडून त्यांच्यावर देखील कारवाई झालीच नाही. एकूणच स्टंटबाजीच्या माध्यमातून पोलीस अधीक्षकांची वाहवाई मोठ्या प्रमाणावर माध्यमातून झाली असली तरी शेतकऱ्यांच्या बाबतीत मात्र त्यांचं धोरण सापत्न पणाचच राहिला आहे. विकासाच्या नावाखाली पवन ऊर्जा कंपन्यांनी घातलेला धुडगूस एसपींना दिसलाच नाही. किंवा मग धृतराष्ट्रासारखी त्यांनी भूमिका घेतल्यामूळेच पवन ऊर्जा कंपन्यांनी मोगलाई सुरू केली आहे की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पवन ऊर्जा कंपन्यांना अश्वस्त करण्यासाठी वेळ मिळाला. मात्र सामाजिक कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांची देखील बैठक घेऊन अश्वस्त करावं अशी मागणी केली. सामाजिक कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनाला एस पी नी केराची टोपली दाखविली. त्यांना वेळ मिळालाच नाही. किंवा त्यांना शेतकऱ्यांची कैफियत ऐकून घेण्याची गरज वाटली नाही मेले तर मरू बापडीचे असाच जणू त्यांनी संदेश दिला आहे. जमिनीचा मोबदला न देणे, कराराचे पालन न करणे, संपादित क्षेत्रापेक्षा जास्तीचे अतिक्रमण करणे,जाब विचारलाच तर दांडगाई करणे असे नव “नीत” किस्से रोज ऐकायला मिळू लागले आहेत. रोहित ढास या शेतकऱ्याची मुळूकवाडी शिवारात गट क्रमांक 657 मध्ये जमीन आहे. या जमिनीलगतच रिन्यू ग्रीन एम एच पी वन प्रायव्हेट लिमिटेड नवी दिल्ली ही कंपनी पवनचक्की उभा करत आहे. उभारणीसाठी रस्ता म्हणून रोहित ढास या शेतकऱ्याच्या उभ्या पिकातून या कंपनीने कुठलाही मोबदला अथवा संबंधित शेतकऱ्याची परवानगी न घेता रस्ता म्हणून जमिनीचा वापर सुरू केला आहे. याच जमिनीतून पोकलेन, जेसीबी, जीप, पिक अप यासारखी वाहन घेऊन जात शेतकरी देशोधडीला लावून उध्वस्त करण्याचं षडयंत्र रचलं जात आहे संबंधित शेतकऱ्यांने जिल्हाधिकाऱ्यांसह पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांना देखील निवेदन दिलं आहे. या निवेदनाला देखील दोन दिवस उलटून गेले आहेत. अद्याप जिल्हाधिकाऱ्यांनी देखील कर्तव्य दक्ष पणा दाखवला नाही. पोलीस अधीक्षकांची देखील तीच स्थिती पाहायला मिळत आहे. एकंदरच जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांचं धोरण शेतकऱ्यांच्या नाश्याचच आहे. तर पोलीस अधीक्षक यांच्या दुर्लक्षामुळे शेतकरी मात्र नव “नीत” होणाऱ्या अन्यायामुळे कावत ( संतापणे )आहे.
पवन ऊर्जा प्रकल्पाशी निगडित व्यवहाराची कायदेशीर बाबी व अनिश्चितता तपासण्यासाठी जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय सनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली होती ती फक्त कागदावरच राहिली. या समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी आहेत तर मुख्य कार्यकारी अधिकारी जि प तसेच पोलीस अधीक्षक सदस्य आहेत. मात्र पवन ऊर्जा प्रकल्पासंदर्भात शेतकऱ्यांकडे जिल्हा प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे.यासाठी कागदावरील समित्या प्रत्यक्षात उतरावाव्यात
डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर
सामाजिक कार्यकर्ते

