महादेव तांडा येथील सेल रिपाॅवर प्रायव्हेट लिमिटेड सोलार कंपनीकडून शेतकऱ्यांची फसवणूक!
गेवराई — पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांनी बीडचा कारभार हातात घेताच जिल्ह्यात सोलार व पवन ऊर्जा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना अश्वस्त करून अभय दान दिलं. याबद्दल कौतुकच आहे. पण सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांनी कंपन्यांकडून पीडित असलेल्या शेतकऱ्यांची कैफीयत ऐकून घेऊन शेतकऱ्यांनाही
संरक्षणाची हमी द्यावी अशी मागणी केली होती. मात्र त्याकडे लक्ष द्यायला व पारदर्शक कारभार करायला अजून तरी एस पी ने धैर्य दाखवलं नाही. त्यामुळे एसपींना पवन ऊर्जा कंपन्यांचाच पुळका शेतकऱ्यांच्या बाबतीत कारभारच गळका ! अशी नवी म्हण म्हटली जाऊ लागली आहे. सध्या शेतकरी हवालदिल तर आहेच शिवाय कंपन्यांची दांडगाही एसपींचा वरद हस्त यामुळे दहशतीच्या कोंडीत सापडला आहे. शेतकरी कसा नागवला जात आहे याचं उदाहरण बालाघाटावरचा शेतकरी तर देईलच शिवाय देव पिंपरी व कोमलवाडीतील शेतकरी ही देतील त्यांची कैफियत ऐकून न्याय देण्याची भूमिका पोलीस अधीक्षक घेणार का ?असा प्रश्न निर्माण झाला आहे.
गेवराई तालुक्यातील देवपिंपरी व कोमलवाडी शिवारातील महादेव तांडा येथे सेल रिपाॅवर प्रायव्हेट लिमिटेड सोलार कंपनीने बस्तान बसवले, त्यासाठी शेतकऱ्यांची जमीन भाडेतत्त्वावर घेण्यात आली. त्यासाठी वर्षाला 80 हजार रु प्रति एकर एकर प्रमाणे शेतकऱ्यांना पैसे देण्याचेही कबूल केले. तीस वर्षाचा हा करार असल्यामुळे दोन वर्षाची रक्कमही शेतकऱ्यांना देण्यात आली.बाकीचे बॉन्ड करून देऊ असे कंपनीकडून आश्वासन दिले होते. परंतु आता भाडेपत्रावर जमीन दिलेल्या शेतकऱ्यांचा कंपनीने मोबदला देणे बंद केले आहे. या संदर्भात शेतकऱ्यांनी विचारणा केली असता कंपनीकडून दांडगाई केली जात आहे. शेवटी कंटाळलेल्या शेतकऱ्यांनी सेल रिपाॅवर प्रा. लिमीटेड विरोधात अमरण उपोषणाला आजपासून सुरुवात केली आहे
याबाबत सविस्तर वृत्त असे की, गेवराई तालुक्यातील महादेव तांडा येथे सेल रिपाॅवर प्रायव्हेट लिमिटेड सोलार कंपनी स्थापन होत आहे. यासाठी या कंपनीचे अधिकारी शेख अफसर जब्रदिन यांनी त्याठिकाणी जाऊन शेतकऱ्यांसोबत चर्चा करून या कंपनीसाठी रविंद्र शिवाजी पवार, ज्ञानेश्वर सुखदेव जाधव, अविनाश अंबादास जाधव, रामनाथ गणपत जाधव, गणेश प्रल्हाद जाधव, अशोक अंबादास जाधव, अनिता रामनाथ जाधव, अभिजित रामनाथ जाधव, अंबादास शेकु पवार या शेतकऱ्यांची जमीन भाडेपत्रावर घेतली.परंतु भाडे पत्रावर जमीन दिलेल्या शेतकऱ्यांचा वार्षिक मोबदला कंपनीने बंद करत शेतकऱ्यांची फसवणूक केली. याप्रकरणी कंपनीच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी जाब विचारला असता, तुम्हाला काय करायचे ते करा माझ्या हातामध्ये काही नाही तुम्ही कायद्याने काय करायचे ते करा असे सांगत धमकावले जात असल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहे. तसेच या शेतकऱ्यांनी संबंधित कंपनीला वारंवार विनंती करूनही कंपनी मोबदला द्यायला टाळाटाळ करत असून उडवाउडवीची उत्तरे देत आहे. तसेच संबंधित कंपनीचे त्या ठिकाणी ऑफिस असून शेतकऱ्यांनी कर्मचाऱ्यांची भेट घेतल्यास आमच्याकडे काही नाही तुम्ही कंपनीकडे तक्रार करा असे म्हणत तुम्ही उपोषणाला बसलात तर आमच्या कंपनीचे कर्मचारी व कंपनीचे काही गुंड लोक तुमचे हात पाय तोडतील अशी धमकी कंपनी अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना दिली जात आहे. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात शेतकऱ्यांनी आपली कैफियत मांडली आहे. यामुळे सेल रिपाॅवर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या विरोधात शेतकऱ्यांनी कंपनीच्या बाहेरच बेमुदत आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. उपोषणाचा आजचा पहिला दिवस असून याकडे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी गांभीर्याने लक्ष देऊन न्याय द्यावा अशी मागणी
शेतकऱ्यांनी केली आहे.
एस पी नी न्याय भूमिका घ्यावी !
पवन ऊर्जा कंपनीचे अधिकारी कर्मचारी गुंडांचा वापर करून दहशतीच साम्राज्य निर्माण करत आहेत. एसपींनी रुजू झाल्यानंतर पवन ऊर्जा कंपन्यांची काम कोणी आडवत असेल तर पोलीस प्रशासन आपल्या पाठीशी आहे. असं सांगण्यासाठी कंपनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. त्याचवेळी आम्ही देखील पवन ऊर्जा कंपनीचे कर्मचारी शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत. त्यांना नागवण्याचं काम करत आहेत. वेळप्रसंगी गुंडांचा वापर करून दहशत निर्माण करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेऊन शेतकऱ्यांना देखील न्याय भूमिका देत हे राज्य कायद्याचं आहे. इथे कंपन्यांची दांडगाई चालणार नाही यासाठी शेतकरी पवन ऊर्जा कंपनी यांची संयुक्त बैठक घ्यावी व कायद्याने सामोपचाराने विकासाचा मुद्दा मार्गी लागावा अशी भावना व्यक्त करून निवेदन दिले होते मात्र एसपींनी अजून कुठलीच कारवाई केली नाही. शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेतली नाही. ती त्यांनी ऐकून घ्यावी अन्यथा आंदोलन करावे लागेल
सामाजिक कार्यकर्त
डॉ. गणेश ढवळे लिंबागणेश कर

