24 नोव्हेंबर पासून बेमुदत चक्काजाम
बीड — पश्चिम महाराष्ट्रानंतर बीड जिल्ह्यातही ऊस दरवाढ करावी यासाठी शेतकरी संघटना आक्रमक झाल्या असून 24 नोव्हेंबर पासून बेमुदत चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. 4000 रुपये प्रति टन असा भाव देण्यात यावा अशी मागणी केली जात आहे.
माजलगाव येथील बाजार समितीत जिल्हाभरातील सर्व शेतकरी संघटनांच्या कार्यकर्त्यांची व ऊस उत्पादक शेतकऱ्यांची नुकतीच बैठक झाली. यावेळी आंदोलनातील विविध टप्प्यांचा आढावा घेण्यात आला.याबाबत शेतकरी नेते अजित नवले म्हणाले की, साखर उतारा हाच अंतिम ऊस दराचा निकष न राहाता रेव्हन्यू शेअरिंग फॉर्मुल्यानुसार साखर उताऱ्यासाठी 70:30 व इतर उपपदार्थावर 75:25 हा शेतकरी व कारखानदारांचा वाटा लक्षात घेऊन उसाला किमान चार हजार रुपये अंतिम ऊस दर मिळायलाच हवा. अशी मागणी करण्यात आली आहे. साखर संचालकांनी या शेतकऱ्यांच्या प्रश्नाची गंभीर दखल न घेतल्यास 24 नोव्हेंबर पासून चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनाची व्याप्ती पूर्ण जिल्हाभर करण्यात येणार असून महसूल प्रशासन, साखर कारखानदार, साखर संचालक यांनी सकारात्मक पहावं अन्यथा उग्र आंदोलन करण्यासाठी शेतकरी कारखान्यावर चालून जाणार असल्याचं शेतकरी संघटनांनी सांगितला आहे.या आंदोलनात अखिल भारतीय किसान सभेचे राज्य अध्यक्ष उमेश देशमुख, शेतकरी संघटनेचे नेते कालिदास आपेट, ॲड. अजय बुरांडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ॲड. ढगे, युवा शेतकरी संघर्ष समितीचे अजय राऊत, जगदीश फडताळे उतरणार आहेत.

