Saturday, December 13, 2025

इथेनॉल उत्पादन;आता शेतकऱ्यांच्या उसाला मिळेल चांगला दर?

पुणे — इथेनॉल उत्पादन करून देशातील सहकारी साखर कारखाने किमान ९ महिने सुरू ठेवण्यासाठी आसवनी प्रकल्पांच्या श्रेणीत सुधारणा करण्यात येणार आहे.

त्यासाठी राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाने ८ टक्के व्याज दराने मुदत कर्ज देण्याचे मान्य केले आहे, तर केंद्र सरकार यात व्याजदराचा निम्मा भार उचलणार असून, कारखान्यांना हे कर्ज केवळ ४ टक्के दरानेच मिळणार आहे.
याचा फायदा राज्यातील ३५ कारखान्यांना, तर देशातील एकूण ६३ कारखान्यांना होणार आहे. कर्जाबाबतचा आदेश येत्या आठवडाभरात निघणार असून साखर हंगाम संपल्यानंतर लागलीच याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

इथेनॉल उत्पादनाला अधिक चालना मिळण्यासाठी कोणती पाऊले उचलावीत यावर विचार करण्यासाठी देशभरातील सहकार क्षेत्रात काम करणारे अधिकारी व तज्ज्ञांची पुण्यात शुक्रवारी बैठक झाली.

महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, कारखान्यांचे व्यवस्थापकीय संचालक, राज्य साखर संघांचे व्यवस्थापकीय संचालक, महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे, केंद्रीय सहकार विभागाचे संचालक डी. के. वर्मा, एनसीडीसीचे संचालक गिरिराज अग्निहोत्री, साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार उपस्थित होते.
सहकारी साखर महासंघाचा पुढाकार
● सहकार क्षेत्राला आर्थिकदृष्ट्या बळकट करण्यासाठी केंद्रीय सहकार विभागाने आसवनी प्रकल्पांच्या श्रेणीत सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेषतः मक्यापासून इथेनॉलचे उत्पादन केल्यास हे प्रकल्प वर्षभर चालतील आणि त्यातून कारखान्यांना आर्थिक स्थैर्य मिळेल, असा होरा आहे.
● आसवनी प्रकल्पांच्या श्रेणीत सुधार करण्यासाठी कारखान्यांना अर्थसाहाय्य मिळावे, यासाठी राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाने पुढाकार घेतला. त्याला केंद्र सरकारकडून प्रतिसादही मिळाला आहे. त्यानुसार राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाने ८ टक्के दराने मुदत कर्ज देण्याचे मान्य केले आहे, तर केंद्र सरकारनेही व्याजातील निम्मा भार उचलण्याचे मान्य केले आहे. त्यानुसार हा व्याजदर केवळ ४ टक्के राहील.
● याबाबतचा आदेश येत्या आठवडाभरात निघेल, अशी माहिती केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी दिली.या निर्णयाचा फायदा देशातील एकूण ६३ सहकारी कारखान्यांना होणार असून यात राज्यातील ३५ कारखान्यांचा समावेश असल्याची माहिती नाईकनवरे यांनी दिली.

दीर्घ मुदतीचे करार
● सहकारी साखर कारखान्यांचा गळीत हंगाम साधारणपणे एप्रिलमध्ये संपतो. त्यानंतर इथेनॉलचे उत्पादन चालू ठेवायचे असेल तर ते धान्यावर चालते.
● इथेनॉल उत्पादन किमान ९ महिने करता येण्यासारखे आहे आणि त्याचा आर्थिक फायदा कारखान्यांना होऊ शकेल. सहकारी साखर कारखान्यांनी त्यांच्या सध्याच्या आसवनी प्रकल्पांचे मल्टिफिडमध्ये रूपांतर केल्यास इथेनॉल उत्पादनाला गती येईल.
● ऑइल मार्केटिंग कंपन्या याबाबत साखर कारखान्यांशी दीर्घ मुदतीचे करार करण्याबाबत अनुकूल आहेत. तसेच इथेनॉलची खरेदी सहकारी
आसवनींकडून प्राधान्याने करण्याचे आदेशही जारी झाले आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles