प्रस्ताव मंजूर होत नाही अन् झाले तर कामे लवकर होत नाहीत; हायटेक कंपनीच्या चौकशीची केली मागणी
मुंबई — बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी मतदारसंघातील वीज, पाणी, रस्ते, स्वच्छता यासह नागरीकांच्या दैनंदिन अडचणींवर लक्ष केंद्रित केले आहे. अनेकवेळा महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करुन ही काहीच फरक पडत नसल्याने, सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात प्रश्न उत्तर सत्रात महावितरण कंपनीच्या गलथान कारमाराची चिरफाड केली.
बीड शहर, बीड ग्रामीण व शिरूर कासार तालुक्यात महावितरणचा गलथान कारभार सुरू आहे. या विरोधात आज आ. संदीप क्षीरसागर यांनी पावसाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करीत महावितरण आणि कॉन्ट्रॅक्टर यांच्या मिलिभगतवर बोट ठेवत चिरफाड केली असून, आधीच प्रस्ताव मंजूर होत नाही आणि झाले तरी काम लवकर पूर्ण होत नाही. तसेच मागील दोन वर्षांपासून आरमोड केबल चे काम पूर्ण न केलेल्या हायटेक कंपनीची चौकशी करावी अशी मागणी केली. आ.क्षीरसागर म्हणाले की, महावितरणचे कोणतेही काम असले की, प्रथम आरडीएसएस योजनेचे नाव पुढे केले जाते. या योजनेतून एखादे काम करण्यासाठी प्रस्ताव दाखल केला तरी त्यास लवकर मंजुरी मिळत नाही. मंजुरी मिळाली तर ते काम लवकर होत नाही. माझ्या शहरात १५ सप्टेंबर २०२३ पासून मंजूर असलेले आरमोड के बल टाकण्याचे काम सुरु आहे. दोन वर्ष झाली हे कामच पूर्ण होत नाही. हे काम हायटेक कंपनीकडून करण्यात येत आहे. हा गैरप्रकार महावितरण आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने सुरू आहे. यासोबतच बीड तालुक्यातील पाली येथे ३३/११ के.व्ही. उपकेंद्र मंजूर आहे. परंतु याचे काम सुरू नाही. तसेच ११ के.व्ही. लाईन बदलणे, तसेच जीर्ण तारा बदलणे, पोल शिफ्टिंग अशी कामे कधी होणार आहेत? आणि दोन वर्षांपासून केबल टाकण्याचे काम संथगतीने करणाऱ्या हायटेक कंपनीची चौकशी करणार का? असे प्रश्न आ. क्षीरसागर यांनी सभागृहात उपस्थित केले.

