
आष्टी — जनावर चारण्यासाठी शेतात गेलेल्या बावी शिवारातील दरेवाडी येथील तरुणावर बिबट्याने हल्ला करून त्याचा जीव घेतल्याची घटना घडल्याने खळबळ माजली आहे
राजू विश्वनाथ गोल्हार वय 35 वर्ष हे नेहमीप्रमाणे आपल्या शेतात जनावर चारण्यासाठी गेले होते. मात्र संध्या काळ झाल्यानंतर बैल घरी येऊनही तो घरी आला नाही. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी व गावकऱ्यांनी शोधमोहीम सुरू केली. शोध घेत असताना त्यांच्या टॉवेलवर रक्ताचे डाग तसेच शेत परिसरात रक्ताचे चिन्ह आढळले. त्यामुळे गावकऱ्यांनी या घटनेची माहिती स्थानिक प्रशासनासह वन विभागाला दिली. दरम्यान शोध घेतल्यानंतर राजू गोल्हार यांचा मृतदेह सापडला. हा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यामुळे झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर रात्री अपरात्री कोणीही घराबाहेर पडू नये शक्यतो समूहाने वावर ठेवावा असा आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. या घटनेमुळे बावी परिसरासह आष्टी तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

