बीड — संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे. नेमका याचाच फायदा घेत एकाने खा. बजरंग सोनवणे यांना फसवले. त्यानंतर याच व्यक्तीने भाजप आमदार सुरेश धस यांनाही गंडवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
आ.सुरेश धस यांनीच हा प्रकार अन्नत्याग करणाऱ्या मस्साजोगकरांसमोर माध्यमांना दिली होती. एकाने कृष्णा आंधळे हा माझ्यासोबत आहे, त्याला कारने घेऊन येण्यासाठी मला पाच हजार रुपये पाठवा, असा फोन धस यांना केला होता. कृष्णा आंधळे हा सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातील महत्वाचा धागा असल्याने धस यांनी कुठलीही शहानिशा न करता संबंधित व्यक्तीला पाच हजार रुपये पाठवले. तसेच नगरमधील एका हाॅटेलमध्ये या फोन करणाऱ्या व्यक्ती आणि आरोपी कृष्णा आंधळे यांची वाट पहात साडेचार तास थांबले होते.
शेवटी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सुरेश धस नगरमधून निघून गेले होते, असे धस यांनी सांगितले. विशेष म्हणजे याच व्यक्तीने खासदार बजरंग सोनवणे यांनाही फोन करून आरोपी कृष्णा आंधळे छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे, त्याला घेऊन येण्यासाठी आॅनलाईन पैसे टाका असे सांगितले.खा. सोनवणे यांनीही संबंधित व्यक्तीला पैसे पाठवले होते. पण नंतर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्याही लक्षात आले होते. बापूराव बारगजे असे गंडवणाऱ्या व्यक्तीचे नाव असल्याचे धस यांनी सांगितले.या व्यक्तीची माहिती आपण आष्टी आणि बीडच्या पोलीस अधिक्षकांना दिली होती. दोन-पाच रुपयासाठी अशी फसवणूक करणाऱ्या औलादीही असतात, असा संताप धस यांनी व्यक्त केला आहे.

