गेवराई — एक धक्कादायक घटना घडली आहे. जनावरांच्या गोठ्यात बांधलेल्या गतिमंद मुलीची सुटका करण्यात आली आहे. शेजारील महिलेच्या जागरुकतेमुळे या मुलीची सुटका झाली असल्याचे समोर आले आहे.

गेवराई तालुक्यातील एका गावामध्ये गोठ्यात बांधून ठेवलेल्या गतिमंद मुलीची एका महिलेच्या जागरुकतेमुळे सुटका झाली. सध्या या मुलीला छत्रपती संभाजीनगर येथील पुनर्वसन केंद्रात दाखल करण्यात आली आहे. या मुलीच्या आईचा मृत्यू झालेला असून वडील दारूच्या आहारी गेलेले आहेत. मुलगी गतिमंद असल्याने तिच्या वडिलांनी तिला चक्क जनावरांच्या गोठ्यामध्ये पायाला दोरी बांधून ठेवले होते.
गंभीर बाब म्हणजे तिला खाण्यासाठी केळी आणि टरबुजाच्या साली दिल्या जायच्या. तिच्या घराशेजारी राहण्यासाठी आलेल्या एका महिलेने या मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकून ही परिस्थिती पाहिली. त्यांना या मुलीची दया आल्याने त्यांनी छ. संभाजीनगर येथील हिना शेख हज हाऊसजवळील खालिद अहमदच्या अनाथाश्रमात नेत
तिची सुटका केली आहे. त्या ठिकाणी आता तिचे समुपदेशन देखील करण्यात आले. छ.संभाजीनगर येथील दामिनी पथकाच्या सहकार्याने हे सर्व कार्यवाही करण्यात आली. महिलेची जागरूकता आणि पोलीस कर्मचाऱ्यांची तत्परता यामुळे या मुलीची सुटका होऊ शकली आहे.

