बीडच्या जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
बीड — अल्पवयीन मुलीचा 31 ऑगस्ट 2023 व एक सप्टेंबर 2023 रोजी लैंगिक छळ करणाऱ्या शिरूर तालुक्यातील नराधमास वीस वर्ष सश्रम कारावास व दहा हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश – 1 एस एस घोरपडे यांनी दिली आहे.
या प्रकरणातील फिर्यादी 2 सप्टेंबर 2023 रोजी सायंकाळच्या सुमारास घरी आले. यावेळी नातवंडामध्ये भांडण झाली होती. यावेळी नातवाने थांब तू काल काय केले होते हे घरच्यांना सांगतो अशी बहिणीला धमकी दिली. यावेळी नातीला याबाबत विचारणा केली असता ती मोठ्याने रडू लागली. विश्वासात घेऊन विचारणा केल्यानंतर तिने सांगितले की,31 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी दीड वाजता शाळा सुटून घरी आले असता आरोपी दारामध्ये बसलेला होता. त्यावेळी दुसऱ्या आरोपीने त्याच्या घरासमोर उभे राहून मला बोलावून घेतले. माझ्या अंगाला हात लावला. नेमका त्याच वेळी भाऊ बोलवायला आला त्याने दारातून आवाज दिल्यामुळे आरोपीने मला सोडले व मी घरी आले. पीडीतेने शिरूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विरुद्ध कलम 376 अ, 376 ड, भा द वि तसेच 5 (ग),6,11(1)12 बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा 2012 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. या प्रकरणाचा तपास पिंक पथकाचे पोलीस उपनिरीक्षक डीपी कोळेकर यांनी केला. जिल्हा व सत्र न्यायालय बीड येथे आरोपी विरोधात दोषारोप पत्र दाखल केले. या प्रकरणाची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश -1 मा. एस एस घोरपडे यांच्या न्यायालयापुढे झाली. दरम्यान आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध करण्यासाठी सरकारी पक्ष तर्फे आठ साक्षीदार तपासण्यात आले. या प्रकरणात पिडिता प्रत्यक्षदर्शी साक्षीदार वैद्यकीय अधिकारी तपासी अधिकारी यांचा पुरावा व सहा. सरकारी वकील अजय तांदळे यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीस कलम सहा बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा 2012 अन्वये दोषी ठरवून वीस वर्षे सश्रम कारावास व दहा हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.

