बीड — अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या मोठ्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारकडून आलेल्या केंद्रीय अंतर-मंत्रालयीन पथकाने आज बीड जिल्ह्यातील विविध भागांचा सखोल दौरा केला . यात बीड तालुक्यातील लिंबा रुई , शिरूर तालुक्यातील येवलवाडी , कारेगाव तसेच आष्टी तालुक्यातील गावांचा समावेश आहे .
राज्यातील खरीप हंगाम २०२५ मध्ये अतिवृष्टी, पूरस्थिती आणि नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचे मूल्यमापन करण्यासाठी हे पथक केंद्र सरकारच्या गृहमंत्रालयामार्फत पाठवण्यात आले आहे . पथकाचे नेतृत्व श्री. के. आर. के. पांडे, सहसचिव , केंद्रीय गृहमंत्रालय करत असून , त्यांच्यासोबत डॉ. एस. व्ही. एस. पी. शर्मा आणि श्री. विशाल पांडे हे अधिकारी सहभागी झाले आहेत . पथकाने बुधवार दिनांक 5 नोव्हेंबर रोजी नुकसानग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी केली .
जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचे चित्र भयावह आहे . अनेक ठिकाणी शेतजमीन वाहून गेली, धरणांचे पाणी ओसंडून वाहू लागले , जनावरांचा बळी गेला , घरं व रस्ते उद्ध्वस्त झाले . या सर्व परिस्थितीचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करण्यासाठी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाने व्यापक तयारी केली आहे . उपविभागीय अधिकारी कविता जाधव , तहसीलदार चंद्रकांत शेळके , गटविकास अधिकारी अशोक राठोड , जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष साळवे , उपविभागीय कृषी अधिकारी उद्धव गर्जे , तालुका कृषी अधिकारी अशोक साळी , मंडळ अधिकारी प्रभू येवले , तसेच ग्राम महसूल अधिकारी नवनाथ तांदळे , संजय पाखरे, प्रवीण सानप , उत्तरेश्वर खांडे , मंडळ कृषी अधिकारी डी. एस. माळी , सहाय्यक कृषी अधिकारी एस. एस. तळेकर , एस. बी. गावडे या सर्वांनी समन्वय साधून क्षेत्रीय पाहणी सुलभ केली .
या पथकाने आज बीड , आष्टी आणि शिरूर कासार तालुक्यांतील अतिवृष्टीग्रस्त भागांना भेट दिली . काही गावांमध्ये शेतजमिनीवरील गाळ , रस्त्यांवरील भगदाडे, नाले-ओढ्यांचे तुटलेले बांध , तसेच घरांचे पडझडीचे प्रकार पाहिले , अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांची व्यथा ऐकली , नुकसानाची कल्पना घेतली .
अधिकृत आकडेवारीनुसार जिल्ह्यातील ८ लाख ६ हजार शेतकऱ्यांचे सुमारे ७ लाख १३ हजार हेक्टर क्षेत्र पावसाने बाधित झाले असून , आतापर्यंत ५ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली आहे तर ४४५ कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम वितरित करण्यात आली आहे .
अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात १ ,००० पेक्षा अधिक जनावरांचे प्राण गेले, १,३१३ घरांचे संपूर्ण किंवा अंशतः नुकसान झाले आणि ७,४७२ सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान झाल्याचे जिल्हा अहवालात नमूद करण्यात आले आहे . सार्वजनिक मालमत्ताना देखील मोठी झळ बसली आहे . बांधकाम विभागाचे रस्ते आणि पुलांचे , महावितरणचे खांब व वीजवाहिन्यांचे तर महामार्ग, शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा, अंगणवाडी व ग्रामपातळीवरील पायाभूत सुविधा या सर्वांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे .
केंद्रीय पथकाने या सर्व अहवालांचा सविस्तर अभ्यास करून शेतकऱ्यांचे प्रतिनिधी, अधिकारी आणि ग्रामपंचायतींशी चर्चा केली . सकाळी शासकीय विश्रामगृह येथे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन , निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी , जिल्हा अधीक्षक सुभाष साळवे यांनी केंद्रीय पथकास सविस्तर माहिती दिली .
जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी सांगितले की, “केंद्रीय पथकाला जिल्ह्यातील प्रत्येक विभागाची तपशीलवार माहिती सादर करण्यात आली आहे . सर्व अधिकारी समन्वयाने काम करत आहेत . शेतकऱ्यांना मदत आणि पुनर्वसनाची प्रक्रिया तातडीने पूर्ण केली जाईल . प्रशासन प्रत्येक गावापर्यंत पोहोचले आहे .”
तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी नागरिकांना भावनिक आवाहन केले : “ ही वेळ कठीण आहे , पण आपण एकत्र राहिलो तर संकट नक्कीच संपेल . पूरग्रस्त भागातील नागरिकांनी शांतता आणि संयम राखावा . प्रशासन तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे . मदतीची यंत्रणा गावोगावी कार्यरत आहे . कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ महसूल विभागाशी संपर्क साधावा .”
केंद्रीय पथकाच्या पाहणीनंतर तयार होणारा सविस्तर अहवाल केंद्र शासनाकडे पाठवला जाणार असल्याचं प्रशासनातर्फे सांगण्यात आला आहे

