जालना — जिल्ह्यात 2022 ते 2024 या कालावधीत अतिवृष्टी आणि गारपिटीच्या शेतकऱ्यांसाठी मंजूर अनुदानात 34 कोटी 97 लाखांचा अपहार केल्या प्रकरणी 10 तलाठ्यांचे निलंबन करण्यात आलं आहे. जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी ही कारवाई केली.
शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर जिल्हाधिकारी यांनी नेमलेल्या चौकशी समितीत बनावट शेतकरी दाखवून, तसेच जमीन नसताना आणि एकाच नावावर दोनदा अनुदान लाटल्याचा प्रकार समोर आला होता. यात 26 तलाठी आणि 10 कृषी सहायक आणि ग्रामसेवकांवर ठपका ठेवण्यात आला होता.
या प्रकरणी सर्वच दोषी तलाठ्यांना 48 तासात लेखी खुलासा करण्याचे आदेश देण्यात आले होते, ज्यात समाधानकारक उत्तर न मिळाल्याने 10 जणांवर निलंबांची कारवाई करण्यात आलीय. दरम्यान चौकशी समितीकडून इतर खुलासे तपासण्यात येत असून आणखी 10 ते 15 जणांवर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जालना जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी अनुदानात झालेल्या घोटाळ्यामुळे मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये अनुदान वाटपात काही घोटाळा झाला आहे का याची चौकशी केली जाणार आहे. या कारवाईने गैरप्रकार करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

