अंबाजोगाई — राजमा बियाणे पुरवठा करण्याच्या नावाखाली अंबाजोगाई येथील एका बियाणे व्यापाऱ्याची १२ लाख ८० हजार २०० रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात साताऱ्यातील ‘येस फ्रेश फार्मर प्रोड्युसर कंपनी’च्या ६ संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंबाजोगाई येथील सुयश प्रेमचंद मुथा रा. गुरुवार पेठ, अंबाजोगाई हे बियाणे व्यवसायाचे काम पाहतात. जुलै २०२५ मध्ये साताऱ्याच्या ‘यश फ्रेश फार्मर प्रोड्युसर कंपनी’चे संचालक संजय बाबासाहेब भगत आणि ओंकार संजय भगत यांनी मुथा यांची भेट घेऊन त्यांना राजमा बियाण्याचे उच्च दर्जाचे नमुने दाखवले होते. त्यानुसार मुथा यांनी २१ जुलै २०२५ रोजी एकूण ८५ टन राजमा खरेदीचा करार केला आणि आरटीजीएसद्वारे वेळोवेळी रक्कम जमा केली. करारानुसार ठरलेला माल तपासण्यासाठी मुथा साताऱ्याला गेले असता, तिथे दाखवल्याप्रमाणे चांगल्या दर्जाचा माल उपलब्ध नव्हता. तडजोड म्हणून त्यांनी २५ टनाची नवीन ऑर्डर दिली आणि एकूण २६ लाख ३१ हजार रुपये जमा केले. मात्र, आरोपींनी ३० ऑगस्ट २०२५ रोजी केवळ १२ टन माल पाठवला,जो अत्यंत निकृष्ट दर्जाचा होता. त्यामध्ये भेसळ, माती आणि पेरणीसाठी अयोग्य साहित्य मोठ्या प्रमाणात होते. उर्वरित मालासाठी किंवा पैसे परत मिळवण्यासाठी मुथा यांनी वारंवार संपर्क केला असता, आरोपींनी पैसे देण्यास नकार दिला आणि अर्वाच्य भाषेत उत्तरे दिली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सुयश मुथा यांनी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी संजय बाबासाहेब भगत, ओंकार संजय भगत, अरविंद सोपान विधाते, सारीका सोमनाथ शिंदे, बालुताई सोमनाथ जगताप आणि बालकृष्ण पंढरीनाथ चव्हाण या ६ संचालकांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. पोलीस निरीक्षक शरद जोगदंड या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
शुक्रवार, दि.६ फेब्रुवारी रोजी आ. विजयसिंह पंडित यांनी बीड शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी माजलगाव बॅक वॉटर काडीवडगाव आणि ईट येथील जलशुध्दीकरण केंद्राची पाहणी केली. या पाहणीत योजनेच्या पाईपलाईनवर पाणी गळती, पाणी वितरणातील अवमेळ, फिल्डवरील बिघाड याकडे झालेले दुर्लक्ष आणि तांत्रिक चुका अशा धक्कादायक बाबी यावेळी समोर आल्या. या सर्वांचा बीड शहराच्या पाणीपुरवठ्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे. माजलगावच्या काडीवडगाव येथील बॅकवॉटरवरून ३६ एमएलटी पाणी प्रत्यक्षात उचलण्यात येत असले तरी मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या पाणी गळतीमुळे ईटच्या जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत हे पाणी पोहोचत नाही. ही अशीच गळती जलशुध्दीकरण केंद्रावरही होत असल्याचे निदर्शनास आल्याने याचा बीड शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होत असल्याचे दिसताच आ. विजयसिंह पंडित यांनी भविष्यातील उन्हाळी परिस्थिती, रजमान व इतर सण लक्षात घेता तातडीने उपलब्ध साधन सामग्रीचा व यंत्रणेचा वापर करून बीड शहराला पाणीपुरवठा सुरळीत करण्या बाबतच्या सूचना पालिका प्रशासन, पाणी पुरवठा विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांना दिल्या आहेत.