Home Blog Page 70

सावकार डॉ. लक्ष्मण जाधव च्या त्रासाला कंटाळून कपडा व्यापाऱ्याची आत्महत्या

0

बीड — भाजप पदाधिकारी डॉ.लक्ष्मण जाधव व त्याची पत्नी यांच्या सावकारकीतून झालेल्या त्रासाला कंटाळून 42 वर्षीय कपडा व्यापाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.


राम दिलीप फटाले वय 42 वर्ष.रा काळा हनुमान ठाणा बीड असं आत्महत्या केलेल्या व्यापाऱ्याचं नाव आहे. राम फटाले हे कपड्याचा व्यापार करत होते आठवडी बाजारात ते दुकान लावून कपडे विक्री करायचे. कपडा व्यवसायासाठी त्यांनी डॉ. लक्ष्मण जाधव या सावकाराकडून कर्ज घेतले होते. कर्जाची रक्कम व्याजासह देऊन देखील जाधव पती-पत्नीकडून मानसिक त्रास देत शिवीगाळ केली जात होती. सावकाराने फटाले यांच्याकडून चेक घेतला होता. पैसे परत देऊनही आणखी पैशाची मागणी करत चेक परत देण्यास इन्कार केला जात होता. याबरोबरच त्यांनी काही पतसंस्थांकडून देखील कर्ज घेतलेले होते. कोरोना नंतर कपडा विक्रीत घट झाली धंदा बसला खर्च वाढला. त्यामुळे व्याजही वाढत गेले जानेवारी महिन्यामध्ये सावकाराच्या रकमेची परतफेड देखील केली. शनिवारी रात्री फोनवरून सावकाराने शिवीगाळ केली. पहाटे पाच च्या सुमारास राम फटाले यांची पत्नी सुलभा झोपेतून उठली. तोपर्यंत राम यांनी पंख्याला दोरी बांधून लटकल्याचे दिसले. त्यांनी मृत्यूपूर्वी सावकार डॉ. लक्ष्मण जाधव व त्याची पत्नी यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याची सात पानी चिठ्ठी लिहून ठेवली.डाॅ. लक्ष्मण जाधव हा भाजपच्या भटके विमुक्त आघाडीचा जिल्हाध्यक्ष आहे.
दरम्यान याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक देविदास चव्हाण करत आहे.

महाराष्ट्र आणि मराठीसाठी आम्ही एकत्र, राज ठाकरेंनी दिले युतीचे संकेत

0

मुंबई — महाराष्ट्र आणि मराठीसाठी आम्ही एकत्र राहणार आहोत. महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न साकारण्यासाठी आम्ही एकत्र असणार आहोत.’, असं राज ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितले.
राज्यात हिंदी भाषा सक्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येत मराठी भाषा विजय दिवस साजरा केला. यानिमित्ताने २० वर्षांनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर आले. ते काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. अखेर राज ठाकरेंनी यावेळी भाषण करताना थेट सरकारवर जोरदार टीका केली.तसंच, ‘हिंदी भाषा बोलणारी राज्यच आर्थिकदृष्या मागास आहेत. ज्या राज्यांना आर्थिक विकास करता आला नाही आणि आम्ही त्यांची हिंदी भाषा शिकायची का? हिंदी भाषासाठी वाईट नाही वाटत. भाषा कोणतीही चांगलीच असते. एक भाषा उभी करायला खूप मेहनत असते. अशाच भाषा उभ्या राहत नाहीत. हा भाषेचा मुद्दा कुठून आला. या हिंद प्रांतावर सव्वाशे वर्षे मराठ्यांनी राज्य केले. इतक्या प्रदेशावर आम्ही राज्य केले तर आम्ही मराठी लादली का? मराठा साम्राज्य सगळीकडे पसरले होते तेव्हा आम्ही मराठी लादली का? महाराजांच्या काळात हिंदी भाषा नव्हती ती २०० वर्षापू्र्वी आली.’, असा इतिहास सांगत राज ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधला.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची मुलं इंग्रजी शाळेत शिकले यावरून त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. त्यावर आता राज ठाकरे यांनी उत्तर दिलं. ‘आम्ही मराठी माध्यमात शिकलो. आमची मुलं इंग्रजीत शिकले. तर आम्हाला विचारचात हे इंग्रजी मिडियम मध्ये शिकतात. बाळासाहेब ठाकरे आणि श्रीकांत ठाकरे इंग्रजीबद्दल शिकले होते. त्या दोघांबदद्ल तुम्ही शंका घेऊ शकता का? लालकृष्ण आडवाणी क्रॉन्वेंट स्कूलमध्ये शिकले होते. त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का? दक्षिण भारतात बघा तमिळ, तेलगूच्या प्रश्नांवर सर्व एकत्र उभे राहतात. उद्या मी हिब्रू भाषेत शिकेल. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे. तुमचा कडवटपणा तुम्ही कुठून शिक्षण घेतेले यामध्ये नसतो. बाळासाहेब ठाकरेंनी मराठीच्या अभिमानाबद्दल तडजोड नाही केली. म्हणे एक भाषा सर्वांना बांधून ठेवते. आजपर्यंत काय वाकडे झाले?’, असा सवाल राज ठाकरे यांनी सरकारला केला.
सरकार पुढे काय राजकारण करणार याबद्दल बोलताना राज ठाकरे म्हणाले की, ‘यांचं पुढचं राजकारण म्हणजे पुन्हा जातीत विभागायला सुरूवात करतील. पुन्हा जातीत तुम्हाला विभागतील. मराठी म्हणून तुम्हाला एकत्र येऊ देणार नाही.’ यावेळी राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना असे देखील सांगितले की, ‘विनाकारण कुणाला मारायची गरज नाही. पण जास्त नाटकी केली तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे. पण चूक त्यांची पाहिजे. असं कोणतीही गोष्ट कराल त्याचे व्हिडीओ काढू नका. आपले आपल्यामध्येच त्यांना कळाले पाहिजे. मारणारा कधी सांगत नाही तर मार खाणारा सांगत असतो मला मारलं. याचा अर्थ उटसूट कुणाला मारायचे नाही.’

जि.प. तांदळवाडी घाट व तांदळेश्वर विद्यालयांमध्ये अवतरली पंढरी

0

चौसाळा — आषाढी एकादशीनिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तांदळवाडी घाट व तांदळेश्वर विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने गावातून दिंडी काढण्यात आली.

जिल्हा परिषद तांदळवाडी घाटच्या विद्यार्थ्यांनी साकारलेली विठ्ठल रुक्मिणीची भूमिका खास आकर्षण ठरली व प्रत्येक दारात या विठू रुखमायीची पूजा करण्यात आली,व ग्रामस्थांनी या दिंडीचे स्वागत आपल्या दारात सडा रांगोळी ने केले,पालखी मध्ये विठ्ठल रुखमाई ची मूर्ती, विद्यार्थ्यांची वारकऱ्यांची वेशभूषा यामुळे गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले.

गावकऱ्यांनी महिला भगिनींनी मोठ्या उल्हासात दिंडीमध्ये सहभाग घेत फुगडी, गवळण,अभंग,भजन करत यामध्ये मंत्रमुग्ध झाले..दिंडीची सांगता विठ्ठल मंदिरात झाली.. दिंडी साठी विशेष सहकार्य शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष श्री.प्रशांत खोसे यांचे लाभले, तसेच सर्व विद्यार्थ्यांना महाप्रसादाची व्यवस्था शिक्षण प्रेमी श्री.अनिल विक्रम खोसे ,श्री.समाधान भैरू खोसे,श्री.शहादेव लक्ष्मण खोसे, यांच्यातर्फे करण्यात आली.. याप्रसंगी श्री.गोरख जगताप,श्री.आनंद खोसे व प्रचंड संख्येने ग्रामस्थ व महिला भगिनीनी हिरीरीने सहभाग नोंदवला..
तांदळेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.श्यामजी डाके सर व जि.प.प्रा.शाळा,तांदळवाडी घाट शाळेचे मुख्याध्यापक श्री.लक्ष्मण क्षीरसागर सर यांनी सर्वांचे आभार मानले..

लैंगिक अत्याचार प्रकरणी विजय पवार व खटोकर ला न्यायालयीन कोठडी

0

बीड — कोचिंग क्लासेस मधील अल्पवयीन विद्यार्थिनीच्या लैंगिक छळ प्रकरणातील आरोपी विजय पवार आणि प्रशांत खटोकर यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.दोन्ही आरोपींना आज न्यायालयापुढे हजर करण्यात आले होते.
लैंगिक छळ प्रकरणात या दोघांना यापूर्वी दोन दिवसांची आणि त्यानंतर पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. आज पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं. पोलिसांनी
आतापर्यंत याप्रकरणी पोलिसांनी 30 जणांचे जबाब नोंदवले असून पीडितेच्या मैत्रिणी, कुटुंबीय, क्लासमधील काही जणांचा समावेश आहे. पोलिसांनी खाटोकरची दुचाकी जप्त केली असून दोघांचे मोबाइल, टॅब, लॅपटॉपही जप्त केले आहेत. तर क्लासमध्ये 40 सीसीटीव्ही कॅमेरे असून त्यांचे डीव्हीआर जप्त केले आहेत. पोलिसांनी या घटनेतील लॅपटॉप, मोबाईल, सीसीटीव्ही फुटेज फॉरेन्सिक लॅबला तपासणीसाठी पाठवले आहे. तसेच 30 पेक्षा अधिक जणांचे जबाब देखील नोंदवले आहेत. आज प्रशांत खाटोकर व विजय पवार यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू असून, पुढील तपासासाठी पोलिसांकडून पुरावे संकलनाची प्रक्रिया सुरू आहे.

आ.संदीप क्षीरसागरांच्या पुढाकारातून मिळणार निराधारांना आधार

0

संजय गांधी, श्रावणबाळ योजनेचे नवीन ३७८ प्रस्ताव मंजूर

बीड — बीड ग्रामीण व शहरी भागातील ३७८ निराधार, दुर्बल‌ लोकांचे संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा निवृत्तीवेतन योजनेंतर्गत प्रस्ताव मंजूर झाले असून आ.संदीप क्षीरसागर यांच्या पुढाकारातून आणि प्रयत्नातून निराधारांना आधार मिळणार आहे.
पात्र वयोवृद्ध निराधार, अपंग, विधवा, परिक्तत्या, दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या समाजातील दुर्बल घटकांना शासनाकडून संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ सेवा निवृत्तीवेतन योजनेंतर्गत आर्थिक सहाय्य केले जाते. बीड विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातील नागरिकांच्या, या योजनांच्या प्रस्तावांवर तातडीने कार्यवाही करून निकषपात्र नागरिकांना लाभ देण्याचे निर्देश आ.संदीप क्षीरसागर यांनी प्रशासनाला दिले होते. त्यावर प्रशासनाकडून आलेल्या प्रस्तावावर कार्यवाही करत २९ मे २०२५ च्या बैठकीत संजय गांधी निराधार योजनेंतर्गत शहरी भागातील ४५ तर ग्रामीण भागातील ६२ नागरिकांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. यासोबतच श्रावणबाळ सेवा निवृत्ती वेतन योजनेंतर्गत शहरी भागातील ४६ तर ग्रामीण भागातील २२५ नागरिकांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत‌. दरम्यान काही अर्ज त्रुटीत असून त्याच्या पुर्ततेसाठी तहसील कार्यालयात संपर्क करण्याचे आवाहनही आ.क्षीरसागर यांनी केले आहे.

माकडाची लाकडं, चुलीला साकडं; गोसावी म्हणतात गुन्हा नोंद नाही केला तर कोण करणार माझं वाकड?

0

चौसाळा — चोरट्यांनी शेतकऱ्यांच्या शेतमालावर दरोडे टाकायला सुरुवात केली असली तरी गुन्हा नोंद करून घेणं नेकनूरचे ठाणे प्रमुख चंद्रकांत गोसावींना जीवावर येऊ लागला आहे. सयाजी शिंदे यांचा धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर चौसाळ्यात सात एकर डाळिंब बागेतील 22 टन फळ चोरून नेली. 22 ते 23 लाखाचा हा दरोडा पडून देखील चोरांना अभयदान देण्याचं काम केलं जात आहे.

( फळ चोरीला जाण्यापूर्वी अशी फळधारणा झालेली होती)

या प्रकरणात आठ दिवस उलटूनही अद्याप गुन्हा नोंद करून घेण्याची गोसावींना गरज वाटली नाही. मग्रुरी इतकी की एस पीं च्या आदेशालाही त्यांनी फाट्यावर मारत हम करे सो कायदा ही भूमिका घेतली आहे.

(चोरी झाल्यानंतर बोडखी झालेली झाड)
गेल्या दोन महिन्यांपासून चौसाळा बायपास वर किरकोळ वाटमारीच्या अनेक घटना घडल्या असल्या तरी या घटनांची दखल पोलिसांनी घेतली नाही. गुन्हा नोंद केला गेला तर नाहीच नाही उलट तक्रार द्यायला आलेल्या लोकांनाच भीती घालण्याचं काम केलं गेलं. “चोरांना मेसाई धार्जीन”अशी म्हण प्रचलित आहे. याचाच अपभ्रंश करून चोरांना “नेकनुर पोलीस धार्जीन” असं म्हटलं जाऊ लागला आहे. अवैध धंद्यांना आश्रय मिळालेलाच आहे. पण आता शेतकऱ्यांच्या शेतमालावर देखील दरोडा पडू लागला आहे. असं म्हणतात की माकडं लाकडं गोळा करून शेकोटी करतात. या शेकोटीला जाळ नसतो. पण ही लाकडं जळणाला जर वापरली तर ती लाकडं जळत नाहीत. न पेटलेल्या लाकडातली उष्णता शेकोटी भोवती बसलेली माकड शोषून घेतात. त्यामुळे “माकडांची लाकडं चुलीला साकडं“अशी म्हण देखील प्रचलित आहे. अशीच काहीशी स्थिती नेकनूरचे ठाणे प्रमुख चंद्रकांत गोसावींनी करून ठेवली आहे. कायद्यातली ऊर्जा ताकत त्यांनी शोषून घेतली. परिणामी जनतेला नेकनूर पोलिसांचं साकडे पडू लागला आहे. हे सांगण्याला कारणही तसंच आहे. चौसाळा बायपास वर सयाजी शिंदे यांची सात एकर डाळिंबाची बाग आहे. उन्हाळ्यात तळहाताच्या फोडाप्रमाणे बाग सांभाळला, टॅंकरने पाणी आणून झाड जोपासली. उन्हाळ्याची तीव्रता कमी व्हावी यासाठी क्रॉप कव्हर टाकण्यात आले. यावर्षी विक्रमी उत्पादन काढण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च केला. डाळिंबाचं पिक जोमान आलं. बागेतली फळ खरेदी करण्यासाठी व्यापारी चकरा मारू लागले. एवढ्यात चोरट्यांची नजर बागेवर पडली. रात्रीत बागेतली सगळी फळ चोरांनी तोडून नेली. 22 टनाहून अधिकचे डाळिंब फळ चोरून नेले. वीस ते पंचवीस लाखाचे शेतकऱ्याचे नुकसान झाले.
सकाळी ही बाब लक्षात येताच चौसाळा पोलीस चौकीला फिर्याद देण्यासाठी शिंदेंनी धाव घेतली. पोलिसांनी लेखी तक्रार स्वतःकडे ठेवून घेतली. ठाणे प्रमुख गोसावी रजेवर आहेत दोन दिवसानंतर गुन्हा नोंद करण्यात येईल असं सांगण्यात आलं. पण गुन्हा नोंद झालाच नाही. शिंदेंनी नेकनूरच्या चकरा देखील मारल्या. एक दोन टन माल चोरीला गेल्याची तक्रार द्या. एवढी मोठी चोरी झाल्याची तक्रार घेता येत नाही असं स्पष्ट गोसावींनी सांगितलं. तक्रार दाखल करून घेतली जात नाही म्हणून शेवटी सयाजी शिंदे या शेतकऱ्याने पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्याकडे धाव घेतली. एसपी समोर त्यांनी कैफियत मांडली. एस पींनी याची दखल घेत तात्काळ गुन्हा नोंद करून घेण्यात यावा असा आदेश चंद्रकांत गोसावींना दिला. पण एसपींच्या आदेश मानतील ते गोसावी कसले? हम करे सो कायदा असं म्हणत एसपींच्या आदेशाला देखील त्यांनी सवयीप्रमाणे फाट्यावर मारलं. या प्रकरणात नऊ दिवसाचा कालावधी उलटून गेला असला तरी अद्याप गुन्हा नोंद झालाच नाही. चंद्रकांत गोसावींच्या चोरांना अभय देण्याच्या मानसिकतेमुळे त्यांच्या प्रामाणिकपणावरच प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे. वाटमारी करणाऱ्या चोरांना गोसावी कुठपर्यंत अभयदान देणार? एसपींच्या आदेशाला असंच आणखी किती वेळेला फाट्यावर मारणार? माकडाची लाकडं कधी सुटणार जनते पुढचं साकडं? असं म्हणण्याची वेळ आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी दखल न घेतल्यामुळे सयाजी शिंदे हे शेतकरी पोलीस आयुक्त, गृहमंत्री यांच्याकडे आता तक्रार करणार आहेत. एस पी नवनीत कावत यांच्या कारकिर्दीलाच काळीमा फासण्याचा काम गोसावी सारखी मंडळी करू लागली आहे ‌.शेतकऱ्यांना पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या कारकिर्दीत तरी न्याय मिळणार का? असा प्रश्न पडू लागला आहे.

खाजगी क्लासेस लैंगिक छळ प्रकरणातील पवारचा आणखी एक कारनामा समोर

0

बीड — उमाकिरण शैक्षणिक संकुलातील विद्यार्थिनीच्या विनयभंग प्रकरणातील आरोपी प्रशांत खाटोकर आणि विजय पवार या दोघांची पोलीस कोठडी वाढवण्यात आल्यानंतर विजय पवार चा आणखी एक कारनामा समोर आला.
. विजय पवार हा माझ्या मुलीला केबिनमध्ये बोलावून बॅड टच करायचा असा आरोप कथित पीडित मुलीच्या पालकांनी केला आहे. विजय पवार संचालक असलेल्या एका शाळेत दोन वर्षांपूर्वी अशाच पद्धतीने एका विद्यार्थिनीला शाळेमध्ये झालेल्या वादाच्या कारणातून त्रास दिला गेल्याची तक्रार संबंधित मुलीच्या पालकांनी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. माझ्या मुलीलाही शाळेबाहेर उभा करायचे. तर कधी केबिनमध्ये बोलावून बॅड टच करायचे असा आरोप या पालकांनी केला आहे. या सर्व प्रकरणात कारवाई व्हावी यासाठी संबंधित पालकाने गेल्या दोन वर्षांपासून पाठपुरावा केला. परंतु अद्याप कारवाई झालेली नाही. आता पोलीस अधीक्षकांनी आवाहन करताच या पालकांनी समोर येत ही तक्रार केली आहे. आता या तक्रारीवर पोलीस अधीक्षकांकडून तपास केला जाणार आहे.

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावर 14 जुलैला सुनावणी

0

नवी दिल्ली — शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरुद्ध ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शवली आहे.सर्वोच्च न्यायालय या प्रकरणी पुढील सुनावणी 14 जुलै रोजी घेणार आहे.

https://x.com/ANI/status/1940287755730256082
ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील देवदत्त कामत यांनी न्यायमूर्ती एमएम सुंदरेश आणि न्यायमूर्ती के विनोद चंद्रन यांच्या खंडपीठासमोर हा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी या आठवड्यात अथवा पुढील आठवड्यात तत्काळ सूचिबद्ध करण्याची मागणी केली.दरम्यान, खंडपीठाने आंशिक न्यायालयीन कामकाजाच्या दिवसांत ही याचिका सूचीबद्ध करण्यास सहमती दर्शवली नाही. तर एकनाथ शिदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी असे सादर केले की, 7 मे रोजी न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठाने तत्काळ सुनावणीची विनंती फेटाळून लावली होती. त्यावर, ठाकरे गटाची बाजू मांडणारे वकील कामत म्हणाले की न्यायमूर्ती कांत यांच्या खंडपीठाने न्यायालयीन सुट्टीत हा मुद्दा उपस्थित करण्याची परवानगी दिली होती.त्यानंतर खंडपीठाने 14 जुलै रोजी हे प्रकरण सुनावणीसाठी सूचीबद्ध करण्याचे निश्चित केले.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला देण्यात आले होते. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरुद्ध शिवसेना ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती. त्यावर आता 14 जुलै रोजी सुनावणी होणार आहे.

मोटार सायकल चोरास अटक, चोरलेल्या सहा मोटार सायकल जप्त्

0

 स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

बीड —  मोटार सायकल चोरणाऱ्या अट्टल चोराची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेने परळी रोड बार्शी नाका या भागातून सापळा लावून पकडले. या कारवाईत अनेक ठिकाणी मोटार सायकली चोरी केल्याच्या घटना उघडकीस आल्या असून तीन लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

स्थानिक गुन्हे शाखेने जिवन रामदास गाडे, वय 24 वर्ष, रा बार्शी नाका,बीड यास चोरीची दुचाकीसह पोलीसांनी परळी रोड येथे सापळा लावुन पकडले. जीवन गाडे हा आरोपी पूर्वीपासून पोलीस रेकॉर्डवर होता .आरोपी जिवन रामदास गाडे यास ताब्यात घेवुन तपास केला असता त्याने ईतरही बीड शहरातील व पुण्यामधील मौटार सायकली चोरल्याचे निष्पन्न झाले. सदर आरोपीकडुन एकुण सहा मोटार सायकली जप्त् करण्यात येवुन 3 लाख 50  हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपीस शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे मोटार सायकलच्या गुन्हयात अटक करण्यात आली आहे. आरोपी  जिवन रामदास गाडे याच्या कडुन खालील मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
1. पोलीस ठाणे शिवाजीनगर गु.र.नं 321/2025 कलम 303(2) बी.एन.एस
2. पोलीस ठाणे शिवाजीनगर गु.र.नं 103/2023 कलम 379 भा.दं.विधान
3. पोलीस ठाणे शिवाजीनगर गु.र.नं 199/2023 कलम 379 भा.दं.विधान
4. पोलीस ठाणे चंदननगर, पुणे शहर गु.र.नं 255/2024 कलम 379 भा.दं.विधान
5. पोलीस ठाणे भोसरी गु.र.नं 1037/2023 कलम 379 भा.दं.विधान
वरील पाच मोटार सायकलचे गुन्हे आरोपी नामे जिवन रामदास गाडे याने केल्याची कबुली दिली आहे. तसेच ईतर एक मोटार सायकल बाबत कोणताही अभिलेख मिळुन आला नाही. त्या बाबत पोलीस तपास करीत आहे. सदरचा जिवन रामदास गाडे हा यापुर्वी वडवणी पेालीस ठाणे यांनी मोटार सायकल चोरीच्या गुन्हयात अटक केली होती.
सदरील कारवाई पोलीस अधीक्षक नवनित काँवत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड,  यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सिद्धेश्वर मुरकुटे, पोलीस हवालदार विकास राठोड, राहुल शिंदे, मनोज परजणे, आशपाक सय्य्द, सुनील राठोड यांनी केली आहे.

बनावट शालार्थ आयडी घोटाळ्याची चौकशी होणार; दोषींकडून सर्व रक्कम वसूल करणार – मंत्री भूसे

0

मुंबई — नागपूरमध्ये उघडकीस आलेल्या बनावट शिक्षक ओळख क्रमांक (शालार्थ आयडी) घोटाळ्याची व्याप्ती वाढत असून राज्याच्या अनेक भागातून अशाच तक्रारी येत आहेत. सरकारे या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून वरिष्ट सनदी अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाच्या(एसआयटी) माध्यमातून या घोटाळ्याची तीन महिन्यांत चौकशी केली जाईल‌.यातील दोषींवर कठोर कारवाई करतानाच त्यांच्याकडून अपहाराची सर्व रक्कम वसूल करण्यात येईल , अशी घोषणा शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी मंगळवारी विधानसभेत केली.

नागपूरसह काही जिल्हयात बोगस शिक्षक ओखळ क्रमांक (शालार्थ आयडी) अपात्र शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नावे पात्र शिक्षकांच्या यादीत घूसवून कोट्यावधी रुपयांचा घोटाळा झाल्याची बाब काही दिवसांपूर्वीच उघडकीस आली आहे. भाजपाचे प्रविण लटके, प्रशांत बंब, नरेंद्र बोंडे आदींनी लक्षेवधीच्या माध्यमातून या गंभीर घोटाळ्याकडे सभागृहाचे लक्ष वेधले. नागपूरमध्ये शिक्षण संस्था, शिक्षण विभागाचे अधिकारी यांनी संगनमताने मृत शिक्षणाधिकाऱ्याच्या बोगस सह्या तसेच बनावट शालार्थ आयडीच्या माध्यातून सन २०१२ ते २०१९ या दरम्यान सरकारचे कोट्यावधी रुपये लाटले.

या घोटाळ्याची व्याप्ती खूप मोठी असून राज्यातील अनेक जिल्ह्यात अशाचप्रकारे बोगस शिक्षकांच्या नावे वेतन व भत्यांच्या माध्यमातून सरकारला फसवण्यात आले आहे. या घोटाळ्यातील सर्व दोषींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन कठोर कारवाई करावी अशी मागणी सदस्यांनी केली. शिक्षण मंत्र्यांच्या नाशिक जिल्हयात विशेषत: मालेगावमध्येही शिक्षण विभागात मोठा घोटाळा झाला असून शिक्षण विभागाचे अधिकारी २० वर्षापासून मालेगावमध्येच ठाण मांडून बसल्याचा आरोप काही सदस्यांनी केला.

शिक्षणमंत्री दादा भुसे यांनीही नागपूरमध्ये मोठा घोटाळा झाल्याची आणि त्याची व्याप्ती अन्य जिल्ह्यातही असल्याची कबुली देताना संपूर्ण राज्यातच अशा प्रकारच्या तक्रारी येत असून त्याची चौकशी करण्याची घोषणा केली. राज्यात गेल्या काही वर्षांपासून हा घोटाळा सुरू असून त्याची विशेष तपास पथकाच्या माध्यमातून चौकशी केली जाईल. एसआयटीमध्ये वरिष्ठ सनदी, पोलीस अधिकारी आणि विधि व न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असेल.

तीन-चार महिन्यात ही चौकशी पूर्ण केली जाईल. त्यात दोषी आढळणाऱ्या शिक्षण विभागील अधिकारी, संस्था चालक, मुख्याध्यापक आणि बोगस शिक्षकांवर कठोर कारवाई केली जाईल. तसेच त्यांनी आजवर घेतलेल्या वेतनाची पूर्ण वसूली केली जाईल असेही भूसे यांनी सांगितले. नागपूरमधील घोटाळयात १९ जणांवर गुन्हा दाखल झाला असून पोलीस आणि शिक्षण विभागाच्या योजना संचालकाच्या माध्यमातून स्वतंत्र चौकशी सुरूआहे. यामध्ये दोषी आढळणाऱ्या सर्वांवर कठोर कारवाई केली जाईल असेही त्यांनी सांगितले.