Home Blog Page 167

मनोज जरांगे पाटलांचे उपोषण नवव्या दिवशी स्थगित !

0

अंतरवली सराटी — आरक्षणाची मागणी करत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी 16 सप्टेंबरपासून उपोषणाला सुरूवात केलं होतं. मात्र, नवव्या दिवशी कोर्टानं उपचार घेण्याचे आदेश दिल्यामुळे जरांगेंनी उपोषण स्थगित करत असल्याची घोषणा केली.

गावातील महिला आणि नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज यांच्या उपस्थितीत जरांगे यांनी पाणी पित उपोषण सोडलं. ‘त्यांच्या हाताने त्यांनी सरकार पाडून घेऊ नये, मी त्यांना जाहीरपणे सांगतो’ असा इशारा यावेळी जरांगे पाटील यांनी दिला. जर आरक्षण दिलं नाही, सगळ्या मागण्या मंजूर नाही केल्या तर माझ्या नावाने बोंबलत बसायचं नाही आणि मला विचारायचं नाही की 2024 ला पाडापाडी कशामुळे ही झाली हे मला विचारायचं नाही. आता सत्तेत बसून आरक्षण घेणार असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

धनंजय मुंडेंसमोर नवं आव्हान; राजाभाऊ फड करणार शरद पवार गटात प्रवेश

0

बीड – लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात महाविकास आघाडीने महायुतीला जोरदार दणका दिला. त्याचीच पुनरावृत्ती करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार सिद्ध झाले आहेत.

महायुतीत परळी विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मिळणार हे जवळपास निश्चित झाले आहे. अजित पवार यांचे अतिशय जवळचे आणि राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून कोण उमेदवार असणार याची कित्येक दिवसांपासून उत्सूकता आहे.

अजित पवार गटाकडून कृषीमंत्री धनंजय मुंडे यांचे परळीत मोठे आव्हान शरद पवार गटासमोर असणार आहे. लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार पंकजा मुंडे यांचा पराभव केल्यामुळे शरद पवार गटाचा आत्मविश्वास दुणावला आहे. मात्र धनंजय मुंडेंना टक्कर देणारा उमेदवार मैदानात उतरवण्याचे त्यांच्यासमोर आव्हान आहे.

बीड मधील परळीच्या जागेसाठी अनेक जण इच्छूक आहेत. परभणी जिल्ह्यातील गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांचे जावई राजाभाऊ फड यांनी नुकतीच शरद पवार यांची भेट घेतली आहे. राजाभाऊ फड उद्या (बुधवार) मुंबईत शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. राजाभाऊ हे परळीचे आहेत. राष्ट्रीय समाज पक्षाचे (रासप) युवा प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेले आहे. परळी विधानसभा निवडणूक लढण्यासाठी ते इच्छूक आहेत. शरद पवारांनी पाठीवर हात ठेवण्याची फक्त ते वाट पाहात असल्याचे सांगितले जाते. राजाभाऊ फड यांचा परळी विधानसभा मतदारसंघात चांगला जनसंपर्क आहे. रासपच्या निमित्ताने कार्यकर्त्यांची फळीही त्यांची तयार आहे.

लोकसभा निवडणूक निकालाने महाविकास आघाडीमध्ये इच्छूकांची भाऊगर्दी आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, बबन गित्ते, सुदामती गुट्टे यांची देखील निवडणूक लढण्याची इच्छा आहे. त्यामुळे उद्या प्रवेश होणारे राजाभाऊ फड हे उमेदवार असणार की, महाविकास आघाडीतील जुण्या नेत्यांना संधी मिळणार,यासंबंधी शरद पवार काय उलटफेर करतात ते पाहावे लागेल.

मल्टीस्टेट घोटाळ्याचा आरोपी बबन शिंदे ची मथुरा पाण्यात; वृंदावन मध्ये पकडला

0

बीड — जिजाऊ माँ साहेब मल्टीस्टेटच्या घोटाळ्याचा प्रमुख आरोपी असलेला बबन शिंदे यास बीड पोलिसांना पकडण्यात यश आले आहे.उत्तर प्रदेशमधील मथुरा वृंदावन परिसरातून बबन शिंदेला अटक करण्यात आली आहे. जिजाऊ मल्टीस्टेट प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यापासून बबन शिंदे पोलिसांना चकमा देत फरार होता.

बीडमध्ये जिजाऊ मॉ साहेब मल्टीस्टेट घोटाळा प्रकरणी बीड जिल्ह्यात 3 तर धाराशिव जिल्ह्यात 2 गुन्हे बबन शिंदे याच्या विरोधात दाखल आहेत. मुख्य आरोपी असलेला बबन शिंदे गेल्या वर्षीच्या जुलै महिन्यापासून फरार झाला होता. गुन्हे दाखल असल्यापासून पोलीस त्याचा ठिकठिकाणी शोध घेत होते. सिम कार्ड बदलत राहण्याची ठिकाणे देखील बदलल्याने पोलिसांना त्याला पकडण्यात अपयश येत होते.मात्र पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यावरून पडताळणी केल्यानंतर बबन शिंदे हा मथुरा वृंदावन भागामध्ये वेश बदलून राहत असल्याचे दिसून आले. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून मोठ्या शिताफिने शिंदे ला पकडले.

मनोज जरांगे यांची प्रकृती बनली नाजूक;आरोग्य तपासणीस नकार

0

जालना — मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा आठवा दिवस आहे. मात्र, त्यांची प्रकृती अत्यंत खालावली आहे. अन्न, पाणी, औषधही न घेतल्याने त्यांच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम होऊ लागला आहे.

आज (दि.२४) सकाळी त्यांनी आरोग्य पथकातील डॉक्टरांना तपासणी करण्यास नकार दिला. त्यामुळे समर्थकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

डॉक्टरांचे पथक तपासणी न करता परत गेले. तर दुपारच्या सत्रातील आरोग्य पथक आरोग्य तपासणी करू द्या, अशी विनंती करत होते. मात्र, तपासणीसाठी जरांगे यांनी स्पष्ट नकार दिला आहे. त्यामुळे आता त्यांचा बीपी किती आहे? शुगर किती आहे? ताप किती आहे? पल्स किती आहेत? याबाबत मराठा समाजासह सर्वांच्या मनात धाकधूक वाढली आहे. आंदोलक महिलांकडून जरांगे यांना पाणी आणि आरोग्य तपासणी करून उपचार घेण्याची विनंती केली.आंतरवाली सराटी येथे मराठा समाजाच्या महिलांनी मोठ्या संख्येने गर्दी केली आहे. महिलांच्या डोळ्यात अश्रू असून पोटतिडकीने त्या उपोषण मागे घेण्याची विनंती करीत आहेत. परंतु मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम आहेत
मराठा आंदोलक संतप्त झालेले असून वडीगोद्री येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. दुसरीकडे बीडमध्ये तर एसटी प्रशासनाने बस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आंदोलक संतप्त असून सरकारने तोडगा काढण्याची मागणी होत आहे.
जरांगे यांची आरोग्य तपासणी करण्यासाठी आज सकाळी ९ वाजता जिल्हा आरोग्यपथक व्यासपीठावर दाखल झाले. केवळ बीपी तपासणी तरी करून देण्याची विनंती आरोग्य पथकातील डॉक्टरांनी केली. मात्र, त्यांनी त्यास विरोध केला. दरम्यान, उपोषणाच्या सातव्या दिवशी सोमवारी सायंकाळी साडे सहाच्या सुमारास जरांगे बाथरूममध्ये जात असताना भोवळ येवून कोसळले होते. त्यांचा बीपी कमी झाला होता. मात्र, उपचार घेण्यास जरांगे यांनी नकार दिला होता.

रेल्वे मार्गाच्या अडचणींसंदर्भात आ.क्षीरसागरांनी घेतली बैठक

0

तक्रारी असलेल्या मार्गावर तात्काळ पाहणी करून कार्यवाही करण्याच्या सूचना

बीड — बीड मतदारसंघातुन जाणाऱ्या रेल्वे मार्गावर नागरिकांना अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. रेल्वे मार्गाच्या कामात अनेक त्रुटी असल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. तसेच काही ठिकाणी अपघात होत आहेत. या भागातील नागरिकांनी यासंदर्भात अनेकवेळा रेल्वे विभागाशी अनेकवेळा संपर्क केला आहे. परंतु रेल्वेकडून कुठलाही सकारात्मक प्रतिसाद नागरिकांना मिळाला नाही. त्यामुळे आ.संदीप क्षीरसागर यांनी सोमवार (दि.२३) रोजी रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्रत्यक्ष, सविस्तर चर्चा करून तक्रारी असलेल्या ठिकाणांची तात्काळ पाहणी करून येथील अडचणी दूर करण्यासंदर्भात सत्वर कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.
बीड मतदारसंघातून नगर-बीड-परळी रेल्वे मार्ग मोठ्या प्रमाणात गेलेला आहे. याचे कामही मोठ्या प्रमाणावर झाले आहे. परंतु या कामांमध्ये अनेक त्रुटी असल्यामुळे या भागातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रेल्वे पुलांच्या खाली पावसामुळे नेहमीच खूप जास्त पाणी साचून राहते. त्यामुळे येथून वाहतूक करणे अवघड होते. ऊस वाहतूक करणारी वाहने याठिकाणाहून जाऊ शकत नाही. वाहतुकीची अडचण होत असल्याने या परिसरात रहिवाशी असलेले १५ ते २० हजार लोकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. काही ठिकाणी रोड तिरका झाल्याने अपघात होत आहेत. या होत असलेल्या अडचणींमुळे येथील नागरिकांनी आतापर्यंत रेल्वे विभागाकडे अनेकवेळा संपर्क केला. परंतु नागरिकांना याबाबत रेल्वेकडून कुठलाही सकारात्मक प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे आ.संदीप क्षीरसागर यांनी सोमवारी (दि.२३) शासकीय विश्रामगृह, बीड येथे रेल्वे विभागाचे संबंधित अधिकारी यांची बैठक घेतली. यावेळी रेल्वे मार्गाच्या अनुषंगाने निर्माण झालेल्या अडचणी संदर्भात अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून अडचणी दूर करण्यासाठी संबंधित ठिकाणच्या प्रत्यक्ष पाहणी करून प्रशासकीय स्तरावर तात्काळ कार्यवाही सुरु करण्याच्या सूचना आ.क्षीरसागर यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना दिल्या. या बैठकीस आ.संदीप क्षीरसागर यांच्यासह माजी आ.सय्यद सलीम, रेल्वे विभागाचे सर्व संबंधित अधिकारी व या भागातील नागरिक उपस्थित होते.

पत्रकार रवी उबाळे यांना पितृशोक; सुरेश उबाळे यांचे निधन

0

बीड — एस.टी. महामंडळ बीड आगार येथील सेवावृत्त वाहतूक नियंत्रक सुरेश उबाळे यांचे अल्पशा आजाराने सोमवारी दि. २३ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी १ .५५ वाजता उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुले, सुना , नातवंडे असा मोठा परिवार आहे.

मंगळवारी दि. २४ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी १० वाजता शहरातील अमरधाम मोंढा रोड येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. उबाळे कुटुंबीयांच्या दुखात “सह्याद्री माझा” परिवार सहभागी आहे.

केज मध्ये भर दिवसा विद्यार्थ्याच्या अपहरणाचा प्रयत्न!

0

केज — शहरातील मुख्य रस्त्यावर सोनार गल्लीत चार चाकी मधून आलेल्या तिघांनी शाळेत चाललेल्या विद्यार्थ्याचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. परंतु काही तरुणांनी हा प्रयत्न हाणून पाडला. अपहरण करणारा एक जण हाती लागला असून दोघे पळून जाण्यात यशस्वी झाले. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.

पकडलेल्या त्या व्यक्तीला पोलिसांच्या ताब्यात दिले असून नेमका हा प्रकार काय ? हे तपासातून समोर येईल. मेन रोडने सकाळी १० च्या सुमारास एक विद्यार्थी सोनार गल्लीतून शाळेला जात होता. त्यावेळी अचानक एक चारचाकी वाहन आले. ते वाहन मुलाजवळ येऊन थांबले काही समजण्याच्या आत अकरा वर्षे वयाच्या विद्यार्थ्याला उचलून वाहनात टाकण्याचा प्रयत्न केला असता घडलेल्या या अनुचित प्रकाराने विद्यार्थी घाबरुन ओरडू लागला हे पाहून बाजुला उभी असलेल्या महिलेनेही आरडाओरडा केली.यावेळी नागरिकांनी धाव घेतली तर दोघांनी दुचाकी चारचाकीच्या समोर लावली असता त्यांना पळता आले नाही. परंतु झटापटीत दोघे पळून जाण्यात यशस्वी झाले तर एकजण जमावाच्या हाती लागला. त्यास जमावाने चांगलाच चोप दिला. दरम्यान पकडलेला आरोपी हा गेल्या चार-पाच दिवसापासून पाळतीवर असल्याचं विद्यार्थ्याच्या पालकानी म्हटलं आहे.
भरदिवसा रहदारीच्या ठिकाणी ही घटना घडल्याने केज शहरात खळबळ उडाली आहे. या पकडलेल्या एका अपहरणकर्त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. हा प्रकार नेमका काय ? हे पोलीस तपासात निष्पन्न होईल. पण शहरात मूल चोरणारी टोळी पकडल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
मात्र पोलिसांनी हा सिंधी विकणारा असून मुलं चोरणारा नसल्याचं खाजगीत सांगत असल्याने पोलीस तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन केज पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.

मराठवाडयात सुर्यघर योजनेतून 31 हजार घरे उजळणार  

0
छत्रपती संभाजीनगर –घराच्या छतावर सौर ऊर्जा संच बसवून मोफत वीज मिळविण्याच्या प्रधानमंत्री सुर्यघर मोफत वीज योजनेला मराठवाडयात उदंड प्रतिसाद मिळत आहे. मराठवाडयातील आठ जिल्हयात 31,153 सुर्यघर योजनेसाठी अर्ज प्राप्त झालेले आहेत. त्यापैकी 31,102 अर्जांना मान्यता मिळाली आहे. तसेच छतावरील सुर्यघर योजनेचे संच बसविण्याचे काम प्रगतिपथावर असून  ही घरे प्रकाशमान होणार आहेत.

या योजनेत केंद्र सरकारतर्फे तीन किलोवॅट क्षमतेपर्यंतच्या प्रकल्पांसाठी ग्राहकांना ७८ हजार रुपयांपर्यंत सबसिडी मिळते. ही योजना फेब्रुवारी महिन्यात सुरू झाली. राज्यात सौर प्रकल्प बसविणाऱ्या २५,०८६ ग्राहकांना अनुदानाची रक्कम रुपये १६० कोटी थेट ग्राहकांना हस्तांतरीत करण्याचे काम सुरु आहे. आजपर्यंत महाराष्ट्रात एकूण ३,५१,९४२ ग्राहकांची प्रधानमंत्री सुर्यघर मोफत वीज योजनेच्या पोर्टलमध्ये नोंदणी झालेली आहे. यापैकी योजनेत २,३३,४३१ ग्राहकांनी महावितरण पोर्टलवर अर्ज केलेला आहे. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेब्रुवारी महिन्यात दरमहा ३०० युनिटपर्यंत मोफत वीज उपलब्ध करुन देण्यासाठी १ कोटी घरांना रुफटॉप सोलर यंत्रणा आस्थापित करण्याचे उद्दिष्ट जाहीर केले आहे. त्या अनुषंगाने  महाराष्ट्रासाठी २० लाख घरांवर रुफटॉप सोलर यंत्रणा आस्थापित करण्याचे उद्दिष्ट आहे. देशाचा हा प्रकल्प रु.७५,००० कोटी पेक्षा जास्त गुंतवणुकीचा आहे.
ग्राहकाच्या गरजेपेक्षा अधिक वीज निर्मिती झाल्यामुळे वीजबिल शुन्य होते. शिल्लक वीज महावितरण विकत घेते.निवासी घरगुती कुटुंबांसाठी प्रति किलोवॅट ३०,००० रुपये अनुदान २ किलोवॅट पर्यंत मिळते. ३ किलोवॅट पर्यंत अतिरिक्त एक किलोवॅट क्षमतेसाठी रु. १८,००० अनुदान मिळते. ३ किलावेंट पेक्षा मोठ्या सिस्टीमसाठी एकूण अनुदान रु. ७८,००० पर्यंत मयांदित आहे
मराठवाडयात सुर्यघर योजनेचे लाभार्थी
मंडल कार्यालय          लाभार्थी
छ. संभाजीनगर          5,361
शहर
छ. संभाजीनगर          3,696
ग्रामीण
जालना मंडल             3,096
छ.संभाजीनगर
परिमंडल                12,153

लातूर मंडल              4,481
बीड मंडल               3,408
धाराशिव मंडल            2,066
लातूर परिमंडल            9,955
नांदेड मंडल              3,746
परभणी मंडल             3,348
हिंगोली मंडल             1,900
नांदेड परिमंडल            8,994
छ. संभाजीनगर
प्रादेशिक कार्यालय         31,102 

मराठवाडयात 31,153 ग्राहकांनी प्रधानमंत्री सुर्यघर मोफत वीज योजनेसाठी अर्ज केले. त्यापैकी 31,102 ग्राहकांचे अर्ज मंजूर झाले असून यातून 20,781.43 किलोवॅट उर्जा निर्मिती होणार आहे. व 5225 ग्राहकांच्या घराच्या छतांवर संच बसवून वीज निर्मिती सुरू झाली असल्याने  यांना मोफत विजेचा लाभ मिळून शुन्य विजबिलाचे लाभार्थी झाले आहेत.  या योजनेसाठी सवलतीच्या दरात बँकेकडून कर्ज उपलब्ध होते. वीज ग्राहकांना https://www.pmsuryaghar.gov.in/ या संकेत स्थळावर योजनेची सर्व माहिती उपलब्ध असून ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरण छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक राहुल गुप्ता यांनी केले आहे.

नागरिकांची काम प्रलंबित ठेवू नका लोकाभिमुख प्रशासनाची गरज — तहसीलदार शेळके

0

चौसाळा — प्रशासनाला लोकाभिमुख करण्याच्या उद्देशाने बीड चे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी चौसाळा महसूल मंडळाची आढावा बैठक आज घेतली. समाजातील सर्व घटकांशी चर्चा करून प्रश्न समजावून घेत सर्व विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना लोकाभिमुख प्रशासन राबवण्यासाठी जनतेचे प्रश्न समजून घ्या. त्यांचे निराकरण करण्यासाठी प्रयत्नशील रहा, नागरिकांची काम प्रलंबित ठेवू नका अशा सूचना यावेळी दिल्या.


चौसाळा महसूल मंडळातील जनतेच्या अडीअडचणी जनतेत गेल्याशिवाय कळणार नाहीत. प्रश्न कळल्याशिवाय लोकाभिमुख प्रशासन राबवता येणार नाही. हे लक्षात घेऊन चौसाळा ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जनतेसह सर्व प्रशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांची आढावा बैठक तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी बोलवली होती. यावेळी बैठकीत ग्रामपंचायत तर्फे तहसीलदार शेळके यांचा सत्कार करण्यात आला. बैठकीत शेतकऱ्यांसह, मजूर, वीज,अनुदान प्रश्न,श्रावण बाळ योजना, ई.के वाय सी, स्वस्त धान्य, मतदार नोंदणी, ई पिक पाहणी, अतिवृष्टी अनुदान, यासारख्या अनेक प्रश्नांची माहिती समाजातील सर्व स्तरातील नागरिकांशी चर्चा करून घेतली. नागरिकांची समस्या जाणून घेत. तात्काळ संबंधित कर्मचाऱ्यांना प्रश्न निकाली काढण्याच्या सूचना तहसीलदार शेळके यांनी दिल्या.अधिकारी कर्मचारी यांच्यात समोरासमोर चर्चा व निराकरण झाल्यामुळे लोकाभिमुख प्रशासन कसं असतं याची चुणूक आज चौसाळकरांना पाहायला मिळाली.
यावेळी मंडळ अधिकारी जायेभाये, तलाठी शिवराम येवले, तलाठी कमलेश निर्मळ, तलाठी निशा खांडेकर, तलाठी उषा राठोड, स्वस्त धान्य दुकानदार, मंडळ कृषी कार्यालयातील कर्मचारी, शिक्षक, चौसाळा ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच, पत्रकार व चौसाळा महसूल मंडळातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता “या”दिवशी मिळणार

0

मुंबई — बहुचर्चित मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे दोन हप्ते मिळाल्यानंतर तिसरा हप्ता कधी मिळणार याकडे लक्ष लागलेले असताना तिसऱ्या हप्त्याची तारीख जाहीर झाली आहे.२९ सप्टेंबर रोजी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता जमा होणार आहे.

रायगडमध्ये योजनेच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं असून तेव्हाच २ कोटी महिलांना तिसरा हप्ता वितरित करण्यात येणार असल्याचं मंत्री आदिती तटकरे यांनी सोमवारी सांगितलं.
आदिती तटकरे म्हणाल्या की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा कार्यक्रम २९ सप्टेंबर रोजी रायगडमध्ये होणार आहे. २९ तारखेला तिसरा राज्यस्तरीय कार्यक्रम होत असून सप्टेंबरपर्यंत आलेल्या अर्जांचे लाभ वितरित करण्यात येतील.
त्या पुढे म्हणाल्या, ज्या महिलांना स्क्रूटिनीमुळे अद्याप लाभ प्राप्त झाला नाही त्यांचे सर्व लाभ दिले जाणार आहेत. २ कोटी महिलांना लाभ दिले जाणार असून लाभार्थ्यांची प्रतीक्षा संपणार आहे.
दोन हप्त्यांचा एकत्रित लाभ

ज्या महिलांना अर्ज भरण्यास विलंब झाला होता, त्या महिलांना ऑगस्ट आणि सप्टेंबरचे एकत्र तीन हजार रुपये सप्टेंबर महिन्याच्या शेवटी मिळणार आहेत, अशी माहिती रविवारी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथील एका कार्यक्रमात दिली होती.

लाभार्थ्यांसाठीचे निकष

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील मूळ रहिवाशी महिलांनाच दिला जातो

योजनेचा लाभ केवळ त्या महिलांनाच मिळेल ज्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे.

21 ते 65 वयोगटातील महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात

जर महिलेच्या कुटुंबातील कोणतीही सदस्य सरकारी नोकरीत असेल किंवा कर भरत असेल तर त्या महिला या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत