धाराशिव — काही दिवसांपूर्वी ऊसतोड मजूर गणेश डोंगरे यांचा ऊस कारखान्यात ट्रॉलीखाली दबून मृत्यू झाला होता. या प्रकरणी डोंगरे कुटुंबीयांना मदत मिळावी, या मागणीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कारखान्यावर ऊसतोड कामगारांनी तीव्र आंदोलन केलं.डोंगरे यांच्या नातेवाईक आणि आंदोलकांनी कारखानाच बंद पाडला.
रील स्टार आणि ऊसतोड मजूर असलेल्या गणेश डोंगरे याचा ३ जानेवारी २०२५ रोजी उमरगा तालुक्यातील भाऊसाहेब बिराजदार कारखान्यावर ऊस ट्रॉलीच्या अपघातामध्ये मृत्यू झाला होता. गणेश डोंगरेच्या मृत्यू नंतर प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. घटनेला ६ दिवस उलटले तरी कारखाना प्रशासनाकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. एवढंच नाहीतर डोंगरे कुटुंबीयांना मदतही दिली नाही.
त्यामुळे डोंगरे कुटुंबीय आणि स्थानिकांनी कारखान्यासमोर जोरदार आंदोलन केलं. मयत गणेश डोंगरे याच्या पश्चात ३ लहान मुलं आहे. त्याच्याा कुटुंबीय आणि मुलांना दहा लाखाची मदत करण्याची मागणी नातेवाईकांनी केली होती. पण, कारखाना प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे कारखान्यावर अपघातामध्ये मृत झालेल्या गणेश डोंगरेच्या कुटुंबाला मदत न केल्यामुळे नातेवाईक आक्रमक झाले. कारखान्याच्या गव्हाणीमध्ये उतरून महिला मुला बाळांसह आंदोलन केलं.
यावेळी संतप्त झालेल्या आंदोलकांनी उमरगा तालुक्यातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा क्यू एनर्जी संचलित भाऊसाहेब बिराजदार कारखाना बंद पाडला. या आंदोलनामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. कारखान्यात मोठा गोंधळ निर्माण झाला होता. त्यामुळे पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला.कारखाना प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत कारखान्याच्या गव्हाणीमध्ये नागरिकांनी ठिय्या मांडला. कारखान्याचे गाळप पूर्णतः बंद पाडले. या आंदोलनात गणेश डोंगरे यांच्या पत्नी अश्विनी डोंगरे, त्यांच्या तीन लहान मुली, भाऊ, आई सहभागी झालेल्या असून आंदोलकांनी कारखाना प्रशासनासमोर गणेश डोंगरेंच्या तिन्ही मुलींच्या नावे प्रत्येकी १० लाख रुपये आणि जखमींना दोन लाखांची मदत द्यावी, अशी मागणी केली. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली.

