बीड — शरद पवार गटाचे नेते राम खाडे यांच्यावर बुधवारी रात्री 10 ते 15 जणांकडून जीवघेणा हल्ला करण्यात आला. अहिल्यानगर – बीड जिल्ह्याच्या सीमेलगत मांदगाव जवळ रस्त्यावर खाडे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे.या हल्ल्यामध्ये राम खाडे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. प्रकृती आणखी गंभीर झाल्यानंतर त्यांना पुणे येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे.मात्र हल्ला कुणी केला कारण काय या संदर्भात अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. दरम्यान या प्रकरणात आ. सुरेश धस यांच्यावर आरोप होऊ लागले आहेत. यापूर्वी आ. धस यांचा जमीन देवस्थान घोटाळा त्यांनी उघडकीस आणला होता. त्यांच्यावर अनेक वेळा हल्ले झाल्याचा देखील सांगितलं जात आहे.
राम खाडे हे सामाजिक कार्यकर्ते आणि शरद पवार गटाचे पदाधिकारी आहेत. ते मांदळी गावातून बीड जिल्ह्यात येत होते. राम खाडे मांदळी गावातून बीड जिल्ह्यात येत असताना दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने त्यांची गाडी थांबवून थेट हल्ला चढवला. या हल्लेखोरांनी खाडे यांच्या गाडीवर जोरदार दगडफेक केली आणि नंतर धारदार शस्त्रांनी राम खाडे यांच्यावर हल्ला केला.
यामध्ये राम खाडे यांना गंभीर दुखापत झाली आहे. राम खाडे यांना प्रकृती चिंताजनक झाल्याने अहिल्यानगरमधील रुग्णालयातून त्यांना तातडीने पुण्यात हलविण्यात आले. या हल्ल्यात राम खाडे यांच्यासह त्यांचे तिघे सहकारी गंभीर जखमी झाले होते.दरम्यान, हा हल्ला राजकीय द्वेषातून करण्यात आल्याचा दावा खाडे यांचे जखमी सहकारी दीपक खिळे यांनी केला. खाडे यांनी अनेकांचे भ्रष्टाचार उघड करून तक्रारी केल्यामुळेच हा जीवघेणा हल्ला घडवून आणण्यात आल्याचेही त्यांनी आरोप केला. खाडे यांच्या तक्रारीनंतर बीड पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून हल्लेखोराचा शोध घेतला जात आहे.

