
सोलापूर — जीव लावतोय माणसावरी माणसापेक्षा मेंढर बरी हे दादा कोंडके च्या चित्रपटातील गाजलेल्या गाण्याची आठवण करून देणारी घटना घडली आहे. कुत्र्याला जीव लावला, तर जिवाच्या पलीकडेही तो कुत्रा प्रामाणिकपणे काम करतो.याचा प्रत्यय नुकताच सोलापूरमध्ये अनुभवायला मिळाला. वडवळ येथे एका शेतकऱ्याचा नऊ दिवसांपूर्वी मृत्यू झाला. मृत्यूनंतर ज्या स्मशानभूमीत त्या शेतकऱ्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले, त्या ठिकाणी शेतकऱ्याचा कुत्रा मागील नऊ दिवसांपासून एकटाच हताशपणे बसून आहे. त्याला स्मशानभूमीतून बाहेर घेऊन जाण्याचा प्रयत्न केला असता तो तेथून जात नाही असे पाहायला मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर जिल्ह्यातील वडवळ येथील शेतकरी तानाजी सदाशिव पवार यांची जेमतेम दोन एकर शेती आहे. पत्नी आणि मुलांच्या सोबत राहणाऱ्या तानाजी पवार यांचा अल्पशा आजाराने 7 ऑक्टोबर 2025 रोजी मृत्यू झाला. मृत्यूनंतर नातेवाईकांनी त्यांच्या पार्थिवावर वडवळ येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले.तानाजी पवार यांचा लाडका कुत्रा स्मशानभूमीतून बाहेर जात नाहीये. मालकावर अंत्यसंस्कार केल्यापासून आता नऊ दिवस झाले, तरी पवार यांचा कुत्रा स्मशानभूमीतच बसून आहे. काहीजणांनी त्याला सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. पण तो कुत्रा स्मशानभूमीतच बसून आहे. हे चित्र पाहताना वडवळ येथील नागरिकांच्या तोंडून मुक्या प्राण्याविषयी तसेच मालकाबद्दल असलेल्या कुत्र्याच्या प्रेमाच कौतुक केलं जात आहे.

