बेळगाव — ऊस तोडणीसाठी गेलेल्या अस्वलआंबा येथील एका कामगाराचा मुकादमानेच दगडाने ठेचून खून केल्याची खळबळ जनक घटना 22 डिसेंबर रोजी रात्री बेळगाव जिल्ह्यातील घटप्रभा येथील एका दवाखान्या समोर घडली आहे.
याप्रकरणी ऊसतोड कामगाराच्या टोळीचा मुकादम श्रीकृष्ण ढाकणे रा. अस्वलआंबा ता. परळी याच्या विरोधात कर्नाटकातील घटप्रभा पोलिस स्टेशनमध्ये 23 डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी मुकादमास पोलीसांनी अटक केली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, विकास बालासाहेब जोगदंड वय 28 वर्ष, रा. अस्वल अंबा, ता. परळी, जि. बीड हा दोन महिन्यांपूर्वी कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यात उसतोडीसाठी मुकादम श्रीकृष्ण विठ्ठल ढाकणे वय 47 वर्ष, रा. अस्वलंबा, ता. परळी, जि. बीड याच्या टोळीत गेला होता. 22 डिसेंबर रोजी मुकादम ढाकणे हा आजारी असल्याने त्यास विकासने उपचारासाठी बेळगावजवळ घटप्रभा येथे घटप्रभा- हुक्केरी दरम्यान असणाऱ्या एका दवाखान्यात आणले. रात्री ढाकणे यास रुग्णालयात दाखल करून विकास रुग्णालयाच्या बाहेर असलेल्या निवारा गृहात झोपला. काही वेळाने ढाकणे अचानक रुग्णालयाच्या बाहेर आला. काही कळायच्या आत त्याने झोपलेल्या विकासच्या डोक्यात भलामोठा दगड घातला. हे पाहून रुग्णालयाच्या सुरक्षा रक्षकाने ताबडतोब ढाकणे याला पकडले. तोपर्यंत विकासचा मृत्यू झाला होता. ढाकणेला सुरक्षा रक्षकाने घटप्रभा पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी पोलिस निरीक्षक एच. डी. मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक एस. आर. कणवी अधिक तपास करीत आहेत. खूनाचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. अस्वलआंबा या गावी 24 डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजता मृत विकासच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.