बीड — अजगरासारखी स्थानिक गुन्हे शाखा सुस्तावलेली असताना एसपींच्या विशेष पथकाने मात्र पुन्हा कारवायांचा धडाका सुरू केला आहे.अंबाजोगाई शहरात गुटख्याच्या गोदामावर मंगळवारी (दि.3) सायंकाळी सातच्या सुमारास छापा टाकला यावेळी 10 लाख 67 हजारांचा गुटखा जप्त करण्यात आला.
पोलीस यंत्रणेत स्थानिक गुन्हे शाखा देखील असते हे जनतेच्या विस्मरणातून जाऊ लागले आहे. भक्ष गिळून पडलेल्या अजगरासारखी स्थिती स्थानिक गुन्हे शाखेची बनली आहे. निष्क्रिय अधिकारी म्हणून उस्मान शेख यांची ओळख निर्माण झाली आहे. हप्ते खोरीतच शाखा ही अग्रेसर आहे की काय असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे. पोलीस अधीक्षकांना देखील याचं काहीच कसं वाटत नाही? ही खुर्ची नुसती उबवायला नाही? त्यांच्यावर कारवाई का होत नाही?त्यांच्या कामाचा लेखाजोखा का पाहिला जात नाही?याबद्दल देखील आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. फुटकळ कारवाया करायच्या अन गावभर दवंडी द्यायची अशी पद्धती एलसीबीची झाली आहे.यातच पोलीस यंत्रणेत बाळराजे दराडे यांच्याच कारवाया जनतेच्या मनावर सध्या तरी राज्य करू लागल्या आहेत.सहा.पोलीस निरीक्षक बाळराजे दराडे यांनी अंबाजोगाई शहरातील एका गुटख्याच्या गोदामावर मंगळवारी छापा मारला. हा छापा अंबाजोगाई शहरातील गणेश प्रोव्हिजन च्या गोदामावर मारून रजनीगंधा, आर.एम.डी, विमल, गोवा, बाबा या नावाचा गुटखा ताब्यात घेतला आहे. या कारवाईत 10 लाख 67 हजारांचा माल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.गणेश बिडवे, किरण रविंद्र शेटे या दोन गुटखा व्यापाऱ्यांना देखील पकडण्यात आले. याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळराजे दराडे, पोलीस उपनिरीक्षक घाडगे,मोराळे, मुंडे,नागरगोजे,मस्के, नामदेव सानप यांचा सहभाग होता.