अनिलदादा जगताप यांचा शिवसेनेच्या वतीने विधानसभा उमेदवारी अर्ज दाखल
बीड — बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून मी गेल्या चाळीस वर्षांपासून बीड मतदार संघात अठरा पगड जाती-धर्मातील शेतकरी, विद्यार्थी, पीडित, उपेक्षित अशा समाजातील प्रत्येक घटकांना सुख-दुःखात आधार देत काम करत आलोय. 2009 पासून मी विधानसभेची तयारी करतोय, परंतु मला संधी भेटली नाही. मात्र महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते मा. एकनाथ शिंदे साहेब आणि संसदरत्न खासदार यांनी माझ्या निष्ठेची दखल घेऊन मला संधी द्यायचे ठरवले आहे व आज त्यांच्याच आदेशानुसार मी शिवसेनेचा उमेदवार म्हणून उमेदवारीच अर्ज भरला आहे. तळागाळातील माणसांची जाण असणारे मुख्यमंत्री शिंदे साहेब आज महाराष्ट्राभरात सर्व सामान्य जनतेसाठी वाखान्याजोगे काम करत आहेत. अगदी असेच काम मी येणाऱ्या काळात बीड मतदार संघात करणार आहे व माझ्याकडे बीडच्या लोकभिमुख विकासाची संकल्पना व त्यानुसार ब्ल्यू प्रिंट सुद्धा तयार आहे. बीडमध्ये क्षीरसागरांच्या वेगवेगळ्या पिढ्यातील माणसं सत्तेवर बसली. मात्र त्यांनी बीडचा विकास केला नाहीच तर बीडच्या विकासाचा खेळखंडोबा केला आहे म्हणून बीडमधील जनता क्षीरसागर मुक्त बीडचा नारा देत आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकात मला कुणाचे आव्हान नसून मीच सर्व उमेदवारांसाठी आव्हान आहे. असे शिवसेनेचे उमेदवार मा. अनिलदादा जगताप यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर माध्यमांना सांगितले.
काल दि. 20 रोजी दुपारी 1.00 वाजता अनिलदादा जगताप यांनी महाराष्ट्राची धाकटी पांढरी श्री क्षेत्र नारायण गड येथील नगद नारायणाचे आणि नवगण राजुरी येथील गणपतीचे दर्शन घेऊन हिंदुहृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना वंदन केले व त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते मा. एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार शिवसेनेच्या वतीने बीड (विधानसभा-230) अर्ज भरून तहसील कार्यालयात दाखल केला. याप्रसंगी शिवसेना महिला आघाडी, युवासेना आजी-माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.