बीड — माजलगाव मतदार संघात विशिष्ट घराण्याची मक्तेदारी व त्यातून निर्माण झालेली सरंजामशाही यामुळे विकासाला खीळ बसली गेली. यातून गोरगरीब जनता पिळवटून निघाली मात्र स्व. गोपीनाथ मुंडे साहेबांच्या घराण्याशी एकनिष्ठ व त्यांच्याच तालमीतले संस्कार घेऊन वाढलेला बाबरी मुंडे या तरुणाने निवडणुकीसाठी शड्डू ठोकल्याने मतदार संघात आता तरी परिवर्तन होऊन नवी पहाट निर्माण होईल अशी आशा जनतेत निर्माण झाली आहे.
एकाच घराण्याच्या पायाशी माजलगाव ची सत्ता लोळण घेत आली आहे. त्यामुळे जनतेच्या विकासापेक्षा स्व विकासाला महत्व दिले गेले. यातून निर्माण झालेल्या सरंजामशाहीमुळे जनता भरडली गेली. पण प्रत्येक निवडणुकीत तोला मोलाचा प्रतिस्पर्धी न मिळाल्यामुळे मतदार संघात परिवर्तन कधी झालेच नाही. त्यामुळे विकासाकडे मतदार संघाची वाटचाल हे दूरा स्वप्न होऊन बसले शेतकरी ,मजूर, गोरगरिबांचे प्रश्न जैसे थे च राहिले गेले. प्रत्येक निवडणुकीत परिवर्तनाची धरलेली आशा फोल ठरत गेली व पदरात निराशाच पडत गेली. हा मतदारसंघाचा इतिहास आहे.
या निवडणुकीत मात्र परिवर्तनाची नवी पहाट उगवेल अशी आशा जनतेच्या मनात निर्माण झाली आहे. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या घराशी एकनिष्ठ राहिलेले व त्यांच्याच संस्काराच्या तालमीत वाढलेला “बाबरी मुंडे”हा उमदा चेहरा या निवडणुकीत हाबुक ठोकून मैदानात उतरणार आहे. भाजपने उमेदवारी दिली तर दुधात साखर दुर्दैवाने नाहीच उमेदवारी मिळाली तर वेळप्रसंगी जनहितासाठी बंडखोरी देखील करायची पण परिवर्तनच घडवून आणायचं असा चंग या तरुणांने बांधला आहे. वडवणीची नगरपंचायत ताब्यात आल्यानंतर या तरुणाने विकासासाठी केलेले प्रयत्न शहराचाच नव्हे तर तालुक्याचा चेहरा मोहरा बदलणारे ठरले. गोरगरिबांनी आवाज दिला की तितक्याच तत्परतेने “ओ” देत आधारही द्यायचा. हा मुंडे साहेबांनी दिलेला मंत्र अमलात आणला. संकटाच्या काळात मदत करणारा हक्काचा चेहरा म्हणून बाबरी मुंडे कडे पाहणारा मोठा वर्ग मतदार संघात निर्माण झाला. लगतच्या धारूरसह माजलगाव तालुक्यातील प्रत्येकालाच निस्वार्थपणे घराचे दरवाजे कायम मदतीसाठी उघडे ठेवले. याबरोबरच सांस्कृतिक चळवळ देखील मोठ्या प्रमाणावर बाबरी मुंडे यांनी राबवली त्यातून तरुणाची नव्या विचाराची फळी निर्माण केली. या सगळ्या वाटचालीमुळे सगळ्यांच्या परिचयाचा असणारा चेहरा म्हणून बाबरी मुंडे कडे पाहिले जाते. बाबरी मुंडे यांना उमेदवारी मिळाली तर नक्कीच परिवर्तनाची नवी पहाट माजलगाव मतदार संघामध्ये उजाडणार आहे. आणखी राजकीय पक्षांचे उमेदवार जाहीर व्हायचे बाकी आहेत पण तत्पूर्वीच जनतेतून त्यांच्या नावाला पसंती मिळत आहे. कदाचित त्यांची उमेदवारी जनतेवर लादली गेलेली सरंजामशाही मोडीत काढणारी ठरेल असा आशावाद निर्माण करणारी ठरू लागली आहे.