मुंबई — किरीट सोमय्याच्या पत्नी मेधा सोमय्या वरील आरोपानंतर संजय राऊत विरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्यात आला होता. शिवडी कोर्टाने या प्रकरणी राऊतांना दोषी मानत १५ दिवसांची कैद आणि २५ हजारांचा दंड ठोठावला.यानंतर संजय राऊतांच्या वतीने जामिनासाठी आणि शिक्षेवरील स्थगितीसाठी वरच्या कोर्टात अर्ज करण्यात आला. यात संजय राऊतांना मोठा दिलासा मिळाला आहे. संजय राऊतांचा अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे.१५ हजारांच्या जात मुचलक्यावर संजय राऊतांना जामीन मंजूर झाला आहे. ३० दिवसांच्या आत वरच्या कोर्टात अपील करून दाद मागण्याची मुभा कोर्टाकडून देण्यात आली आहे.
देशाच्या सर न्यायाधीशांच्या घरी पंतप्रधान गणपतीचे मोदक खाण्यासाठी जातात, मग आमच्यासारखे लोक भ्रष्टाचाराविरोधात आवाज उचलतात त्यांना न्याय कुठून मिळणार. हे अपेक्षितच आहे असं सांगत संजय राऊतांनी पहिली प्रतिक्रिया दिली. आम्ही कोर्टाचा आदर करतो. युवक प्रतिष्ठानच्या माध्यमातून मीरा भाईंदरमध्ये काही काम झाले होते त्यात काही बेकायदेशीर घडले, हे मी बोललो नाही तर मीरा भाईंदरचे विरोधी पक्षनेते प्रविण पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होते. त्यावर तिथले आमदार प्रताप सरनाईक यांनीही तपास व्हावा, त्यात भ्रष्टाचार झालाय म्हटलं होते. त्यावर विधानसभेत चर्चा झाली. त्यानंतर कायदेशीर कारवाई व्हायला हवी यावर विधानसभेत चर्चा होऊन कायदेशीर आदेश पारित केला. हे जर मी बोललो असेल तर माझ्याकडून अब्रुनुकसानी कशी झाली, हे सगळे ऑन रेकॉर्ड आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
अस आहे प्रकरण !
मीरा-भाईंदर महापालिकेकडून मीरा-भाईंदर शहरात १५४ सार्वजनिक शौचालये बांधण्यात आली. त्यापैकी १६ शौचालये बांधण्याचे कंत्राट भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्या युवा प्रतिष्ठानला मिळाले होते. बनावट कागदपत्र सादर करुन मेधा सोमय्या यांनी मीरा-भाईंदर पालिका अधिकाऱ्यांची फसवणूक केली, असा आरोप संजय राऊत यांनी केला होता. मेधा सोमय्या यांनी त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांना कोर्टात आव्हान दिले होते. या प्रकरणात दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर यात संजय राऊत यांना अब्रुनुकसानीच्या प्रकरणात १५ दिवसांचा तुरुंगवास आणि २५ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.