अमरावती — महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सत्तेसाठी अनपेक्षित आणि अभद्र युती होताना दिसत आहेत. दरम्यान अमरावतीमध्ये चक्क भाजपा आणि एमआयएमने युती केली असून दोन वेगळ्या विचारांचे पक्ष एकत्र आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
अमरावती जिल्ह्यातील अचलपूर नगर परिषदेत सत्ता स्थापनेसाठी भाजप आणि एमआयएमने एकत्र येत सभापती बनवत सत्ता स्थापन केलेली आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून हिंदुत्ववादी म्हणणाऱ्या भाजपवर विरोधी पक्षांकडून जोरदार टीकेची झोड उठवली आहे.
अमरावतीच्या अचलपूर नगरपरिषदेत भाजप आणि एमआयएमची युती झाली असून अचलपूर नगर परिषदेच्या समिती सभापती पदासाठी भाजप आणि एमआयएमने एकमेकांना साथ दिली आहे. त्यामुळे एमआयएमच्या नगरसेवकाला शिक्षण व क्रीडा समितीचे सभापती पद मिळाले आहे. एमआयएमच्या 3, अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या 2 आणि तीन अपक्ष नगरसेवकांचा गट हा भाजपासोबत गेल्याने अचलपूर मध्ये भाजप आणि एमआयएम सोबत आली असल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान या संपूर्ण सावळ्या गोंधळावर वडेट्टीवारांनी भाजपाचा खरपूस समाचार घेतला आहे. भाजप आणि एमआयएमची सेटिंग आहे. हे दोघेही जेवताना वेगवेगळे सोबत जेवतात. एक व्हेज खाते तर एक नॉन व्हेज खातो. एमआयएमचा फायनान्सर कोण आहे? काँग्रेसला कमकुवत करण्यासाठी हे सुरू आहे. काही काळासाठी हे चालेल पण सत्यता बाहेर येईल. तसेच हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे शाही स्नानापासून शंकराचार्य यांना मारहाण झाली यावरून ही विचारांची विकृती आहे. हिंदुत्व सत्ता मिळवण्यासाठी आहे त्यापेक्षा दुसरा काही संबंध हिंदुत्ववाशी नाही. अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेला माणिकर्णिका घाट जमीनदोस्त केला. हे पाहता भाजपचे हिंदुत्वाशी देणं घेणं नाही. हे फक्त सत्तेसाठी हिंदुत्व आहे असे म्हणत वडेट्टीवार यांनी भाजपचा खरपूस समाचार घेतला आहे.
ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनीही भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. भाजप निर्लज्ज सदासुखी सत्तेसाठी वाटेल ते करू शकतो अशी टीका त्यांनी केली आहे.
दरम्यान हिंदुत्ववादी भाजपने अचलपूरमध्ये सत्ता स्थापनेसाठी एकत्र येत सभापती बनवल्यानंतर भाजपचे वरिष्ठ नेते काय निर्णय घेतात की स्थानिक भाजपने घेतलेल्या निर्णयाला भाजपचे वरिष्ठ नेते साथ देतात हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे

