केज — पत्नीचे परपुरुषासोबत अनैतिक संबंध, तसेच पत्नी, सासू आणि पत्नीच्या प्रियकराकडून होत असलेला शारीरिक व मानसिक छळ सहन न झाल्याने केज येथील ४० वर्षीय तरुणाने गळफास घेऊन जीवन संपविल्याची घटना घडली आहे.या प्रकरणी जनांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्नीच्या प्रियकरावर ॲट्रॉसिटीअंतर्गतही गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
आश्रुबा उर्फ उत्तम शिवाजी जाधव (वय ४०, रा. हाउसिंग कॉलनी, केज) असे मृताचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आश्रुबा जाधव यांच्या पत्नी मनीषा जाधव हिचे केज येथील मयूर पाटील देशमुख या परजातीतील अविवाहित तरुणाशी मागील एक वर्षापासून अनैतिक संबंध होते. मयूर देशमुख याने मनीषासाठी धारूर रोड परिसरात एक खोली भाड्याने घेतली होती. त्या ठिकाणी मनीषा, तिचा प्रियकर आणि आश्रुबा यांची दोन मुले हे पती-पत्नीप्रमाणे राहत होते.
दि. १९ जानेवारी २०२६ रोजी आश्रुबा जाधव हे धारूर रोड येथील त्या खोलीवर गेले असता, पत्नी मनीषा, तिचा प्रियकर मयूर देशमुख आणि सासू मंगल भारत खाडे यांनी त्यांना धक्काबुक्की करत जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देत त्यांना तेथून हाकलून दिल्याचा आरोप आहे.
या सततच्या अपमान, छळ आणि पत्नीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून आश्रुबा जाधव यांनी दि. २० जानेवारी रोजी हाउसिंग कॉलनीतील आपल्या राहत्या घरी लोखंडी आडुला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली.या प्रकरणी मयताचे भाऊ युवराज जाधव यांनी दिलेल्या तक्रारीवरून केज पोलीस ठाण्यात मयूर प्रताप पाटील देशमुख, पत्नी मनीषा जाधव आणि सासू मंगल भारत खाडे यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल होताच तीनही आरोपींना पकडले आहे.प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक व्यंकटराम हे करीत आहेत.

