सातारा — फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी राज्य सरकारने विशेष तपास पथक म्हणजेच SIT ची स्थापना करणार असल्याची घोषणा केली होती. 24 ऑक्टोबर रोजी समोर आलेल्या या प्रकरणात आतापर्यंत दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान या प्रकरणाचा तपास आयपीएस तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली एस आय टी करणार आहे.
फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत महिला डॉक्टरने 23 ऑक्टोबर रोजी आत्महत्या केली होती. तिने तळहातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर यांचे नाव लिहिले होते. दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली. त्यनंतर या प्रकरणामध्ये अनेक महत्त्वाच्या आणि मोठ्या नावांचा समावेश असल्याने पीडित डॉक्टरच्या कुटुंबासह विरोधकांनी सातत्याने या आत्महत्येच्या घटनेची एसआयटी चौकशी मागणी करण्यात येत होती. सातारा पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास झाल्यास त्यांच्यावर राजकीय दबाव येण्याची शक्यता असल्याने नि:पक्ष तपासासाठी विशेष तपास पथक नेमणे आवश्यक आहे, असे विरोधक म्हणत होते.
एका प्रकरणात महिला डॉक्टरने आपल्या तक्रारीमध्ये वरिष्ठांचा आणि पोलिसांचा दबाव असल्याचे नमूद केले होते. शवविच्छेदन अहवाल बदलण्यासाठी खासदाराचे सहाय्यक दबाव टाकत असल्याचा उल्लेख तिने केला होता. पण, पोलीस आणि आरोग्य अधिकाऱ्यांनी तिच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले. याच दबावामुळे तिने शेवटी आत्महत्या केल्याचा संशय विरोधकांनी यावेळी व्यक्त केला होता. दरम्यान, या प्रकरणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी भाजपचे माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांचे नाव घेतले आहे. फलटणमधील अनेक घटना निंबाळकर आणि त्यांच्या लोकांच्या हस्तक्षेपामुळे घडत असल्याचा दावा सुषमा अंधारे यांनी केला होता. असे असताना संबधित प्रकरणाचे गांभीर्य आणि संवेदनशीलता लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच पोलीस महासंचालकांना एसआयटी स्थापन करण्याचे निर्देश दिले होते. अखेर एसआयटी स्थापन करण्यात आली असून IPS तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वात तपास करण्यात येणार आहे. तेजस्वी सातपुते या 2012 मधील आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी यापूर्वी सातारा तसेच सोलापूर जिल्ह्यांमध्ये पोलीस अधीक्षक म्हणून काम केले आहे.

