बीड — तालुक्यातील पाली येथील धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कॅनरा बँकेच्या शाखेच्या इमारतीची भिंत चोरट्यांनी फोडली. आत शिरलेल्या चोरट्यांनी गॅस कटरने मुख्य लॉकर उघडून आतमधील तब्बल १८ लाख ३६ हजार २०० रुपयांची रक्कम लंपास केली. गुरुवारी दि.३० ऑक्टो. पहाटे घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच सकाळी बीड ग्रामीण पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांतील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

धाडसी चोरीची घटना घडली ते ठिकाण धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बीड शहरपासून अवघ्या १० कि.मी.अंतरावर आहे. गुरुवारी पहाटे या बॅँकेजवळ आलेल्या चोरट्यांनी बॅँकेची रेकी केल्याचा अंदाज वर्तवला जात असून त्यांनी बॅँकेच्या पाठीमागील बाजूची भिंत फोडून आत प्रवेश केला. कसलाही आवाज होवू नये या हेतूने गॅस कटरच्या सहाय्याने बँकेचे मुख्य लॉकर तोडले आणि आतील 18 लाख 36 हजार दोनशे रुपयाची रोकड लंपास केली. दरम्यान सकाळी हा धाडसी चोरीचा प्रकार समोर आल्यानंतर बॅँक अधिकाऱ्यांसह पोलीसही चोरट्यांच्या या चोरीच्या या पध्दतीने चक्रावून गेले. दरम्यान ठसे तज्ञांनाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. ही घटना बीड ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत घडली असून या ठिकाणी पोलिसांची दररोज रात्री ते पहाटेपर्यंत गस्त असते; मात्र पोलिसांची नजर चूकवून चोरट्यांनी लाखोंची रक्कम लंपास केल्याने खळबळ उडाली. आता या प्रकरणात संध्याकाळपर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु होती.

