पुणे — स्वारगेट बस स्थानकात शिवशाही बस मध्ये पहाटे साडेपाचच्या सुमारास एका 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने संपूर्ण राज्यात संतापाची लाट पसरली आहे. आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे.
या प्रकरणातील मेडिकल रिपोर्टमध्ये पीडित तरुणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचं मेडिकल रिपोर्टमधून स्पष्ट झाले आहे. माहितीनुसार, संध्याकाळी ससुन रुग्णालयाने हा वैद्यकीय अहवाल पोलिसांना दिला आहे. या अहवालात आरोपीने पिडितेवर एकदा नाही तर दोनवेळा लैंगिक अत्याचार केला असल्याची माहिती देण्यात आली आहे. सध्या आरोपी दत्तात्रय गाडे फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.तर दुसरीकडे या प्रकरणात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोठी कारवाई करत स्वारगेट डेपोमधील 23 सुरक्षा रक्षकांचे तत्काळ निलंबन करून तसेच डेपो मॅनेजर आणि वाहतूक नियंत्रक यांची चौकशी करुन एका आठवड्यात चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे. 23 सुरक्षा रक्षकांचे तत्काळ निलंबन करून उद्यापासून त्यांच्या जागी स्वारगेट डेपोमध्ये नवीन सुरक्षारक्षक कामावर रुजू करण्याचे आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहे.
असं आहे संपूर्ण प्रकरण!
पहाटे 5.30 च्या सुमारास पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात एका 26 वर्षीय तरुणीवर बसमधे अत्याचाराची घटना घडली. पीडित तरुणी पुण्याहून फलटण्याच्या दिशेने जात होती. बससाठी ती स्वारगेट बस स्थानकावर थांबली असता आरोपी दत्तात्रय गाडे तिकडे आला आणि पीडित तरुणीला स्वारगेट आगारात मधोमध उभी असलेली बस फलटणला जाणार आहे असं सांगितलं. उभी असणारी बस सोलापुरला जाणार आहे आणि मधे बस फलटणला थांबणार आहे. असं त्याने पिडितेला सांगितले.यावेळी तो पीडित तरुणीला ताई- ताई म्हणत होता. त्याच्यावर विश्वास ठेवून तरुणी बस जवळ आली मात्र बस बंद असल्याने तू टॉर्च लावून आतमध्ये जा. हीच बस काही वेळात फलटणला निघेल असं आरोपीने तरुणीला सांगितलं. त्यानंतर तरुणी बसमध्ये चढली आणि तिच्या पाठीमागे बसमध्ये आरोपी दत्तात्रय गाडे देखील चढला आणि बस बंद केली. त्यानंतर तरुणीला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार केला आणि तिकडून पळ काढला. तरुणी घाबरल्याने तिच्यासोबत घडलेला प्रकार कोणाला सांगितलं नाही. त्यानंतर फलटणला जाण्यासाठी तरुणी दुसऱ्या बसमध्ये बसली आणि तिने हा संपूर्ण प्रकार घरच्यांना सांगितला.

