आष्टी — समाज माध्यमावर एकमेकांविरोधात स्टोरी स्टेटस टाकण्याच्या कारणावरून रक्तरंजीत थरार आष्टी तालुक्यातील रुईनालकोल मध्ये झाला. तीन जणांवर धारदार शस्त्राने हल्ला केला गेला यामध्ये एकाचा मृत्यू होऊन दोन जण गंभीररित्या जखमी झाले आहेत.
रूईनालकोल येथे सोमवार दि 16 फेब्रुवारी रात्रीच्या सुमारास ही थरारक घटना घडली. गंभीररित्या जखमी झाल्याने उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जाताना दिपक शिवाजी नालकोल या 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. जखमींवर अहिल्यानगर येथील खाजगी रूग्णालयात उपचार सुरू असल्याचं सांगितलं जात आहे.मिळालेल्या माहितीनुसार, आष्टी तालुक्यातील रूईनालकोल येथील जिल्हा परिषद शाळेच्या समोर ही भयानक घटना घडली असून सोमवारी तरूणांच्या दोन गटात इंन्टाग्राम, व्हॉट्सअॅपवर एकमेकांच्या विरोधात स्टोरी टाकण्याच्या कारणावरून वाद भडकला. काही वेळातच, हा वाद टोकाला पोहोचला आणि वादाच्या दरम्यान एका गटातील तरूणांनी तीन जणांवर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात तिघे गंभीररित्या जखमी झाले.जखमी झालेल्या तरूणांना उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जाताना दिपक नालकोल नावाच्या तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. तर इतर 2 जखमी तरूणांवर अहिल्यानगर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं बोललं जात आहे. घटनास्थळी आष्टीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय नरवाडे, विक्रांत हिंगे, पोलीस उपनिरीक्षक कृष्णा शिंदे, याच्यासह अंमलदारांनी भेट दिली असून पोलीस पुढील तपास करत असल्याची माहिती आहे.




