मुंबई — राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच विमान अपघातात बुधवारी निधन झालं. त्यांच निधन होताच राजकीय हालचालींनी वेग पकडला रिक्त झालेली त्यांची जागा भरून काढण्याची जबाबदारी सुनेत्रा पवार यांनी घेतली.राजभवनातील लोकभवनात सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असून पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून त्यांच्या नावाची नोंद झाली आहे.
शनिवारी दुपारी अडीच वाजण्याच्या दरम्यान सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड झाली. त्यानंतर सायंकाळी 5 वाजता त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांना शपथ दिली. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंचावर उपस्थिती होती.
सरकारमधील अनेक मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, भाजप आणि शिवसेना त्यांची उपस्थिती होती. कुठलाही गाजावाजा न करता अत्यंत साध्या पद्धतीने शपथविधी सोहळा पार पडला आहे.
दरम्यान, शनिवारी सकाळी पत्रकार परिषदेमध्ये शरद पवारांनी शपथविधीबद्दल माहिती नसल्याचं म्हटलं होतं. हा त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे, आपल्याला याबाबत काहीही सांगितलं नसल्याचं पवार म्हणाले होते. त्यानंतर पार्थ पवार यांनी शरद पवारांची भेट घेतली आणि शपथविधीचं निमंत्रण दिल्याचं सांगितलं गेलं. मात्र शरद पवार हे शपथविधीसाठी हजर नव्हते.
दुसरीकडे खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या मूळ गावी काटेवाडी येथे जात अजित पवारांच्या आईंची भेट घेतली. एकीकडे मुंबईत शपथविधी सोहळा सुरु होता तर दुसरीकडे बारामतीमध्ये मात्र शोकाकूल वातावरण होतं. वेगाने घडलेल्या या राजकीय घडामोडींच आश्चर्य व्यक्त केलं जात आहे



