बीड — खोक्या उर्फ सतीश भोसले याला अमानुष मारहाण प्रकरणात न्यायालयीन कोठडी सुनावत कारागृहात रवानगी करण्यात आली. त्यावेळी कारागृह आवारात पोलिसांनी व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याचं वृत्त “सह्याद्री माझा” ने व्हिडिओसह प्रसिद्ध करताच पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी संबंधित पोलिसांना निलंबित करण्याचे जाहीर करून कारणे दाखवा नोटीस देणार असल्याचे सांगितले आहे.
खोक्या उर्फ सतीश भोसले याच्यावर अमानुष मारहाणी सोबतच त्याच्या घरात वन्य जीवांची हत्या केल्याचे अवशेष सापडले. मारहाण प्रकरणात त्याला शिरूर न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. दरम्यान जिल्हा कारागृह आवारात बाहेरचा डबा आणून खोक्याला जेवण देण्यात आले. याबरोबरच खंडीभर कार्यकर्ते त्याच्या दिमतीला उपस्थित होते. खोक्याचे जेवण झाल्यानंतर मिनरल वॉटर हातावर ओततताना कार्यकर्ता दिसत आहे. राजा महाराजाला शोभेल अशी बडदास्त त्याची ठेवण्यात आली होती. या संदर्भातला कथित व्हिडिओ व्हायरल झाला होता. या प्रकरणाच्या अनुषंगाने सह्याद्री माझा ने वृत्त प्रसिद्ध करताच पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी यावेळी कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना निलंबित करून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याचे सांगितले. पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी तडकाफडकी निलंबनाच्या आदेश दिल्यामुळे पोलीस दलात खळबळ माजली आहे

