परळी — नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार संध्या देशमुख यांचे पती दीपक देशमुख यांनी सरकारच्या सुरक्षा यंत्रणेवर भरवसा नसून, ईव्हीएम मशिन ठेवलेल्या स्ट्राँग रूमजवळ झोपण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी केली. दीपक देशमुख यांच्या या मागणीपुढं बीड प्रशासन आवाक झालं आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नगरपालिका निवडणुकांची मतमोजणी एकाच दिवशी 21 डिसेंबरला होणार आहे. त्यामुळे काल झालेल्या नगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीला तब्बल 16 दिवस जाणार आहेत. तोपर्यंत ईव्हीएममधील मत सुरक्षित राहतील का या विचारानं उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.
परळी नगरपालिकेची निवडणूक चांगलीच गाजली. मतदान झालेल्या ईव्हीएम मशिन आता कडक बंदोबस्तामध्ये स्ट्राँग रूममध्ये ठेवल्या गेल्या आहेत. यासाठी बीड प्रशासनाने तगडा पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. परंतु या सुरक्षा यंत्रणेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवाराच्या पतीने दीपक देशमुख यांना भरवसा नाही. लोकांनी आम्हाला केलेली मत सुरक्षित ठेवण्याची आमची देखील जबाबदारी आहे. त्यामुळे मला स्ट्राँग रूमजवळ झोपण्याची परवानगी मिळावी. तशी त्यांनी बीड प्रशासनाकडे देखील मागणी केली आहे.दीपक देशमुख म्हणाले, “आम्हाला इथं अंथरून-पांघरून घेऊन येत, राहण्याची मुभा द्यावी. तशी आमची व्यवस्था देखील करावी. कारण आमचं भविष्य या स्ट्राँग रूममध्ये आहे. स्ट्राँग रूममधील आमचा कोणावरही भरोसा नाही.” स्ट्राँग रूमकडे जाण्या-येण्याची आमची व्यवस्था होत नाही. त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांना मी पत्र देणार, असेही दीपक देशमुख यांनी म्हटले.आमची इथंच व्यवस्था करा, 24 तासाची. उमेदवारांसह मी या स्ट्राँग रूमच्या परिसरात थांबणार आहे. मी सकाळी झोपेतून उठून स्ट्राँग रूमकडे आलो आहे. यासाठी निवडणूक आयोगाकडे मागणी करणार आहे. मला इथं कशी व्यवस्था करायची, हे त्यांनी सांगावं मी माझं अंथरूण-पांघरूण घेऊन इथं येऊन बसेल. मला इथेच थांबायचं आहे आणि या स्ट्राँग रूमचं रक्षण करायचा आहे. जाण्या येण्यामुळे दमछाक होत आहे. दुसरीकडे माझे पाच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. त्यांच्यासाठी वीस तारखेला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यांचा प्रचारही मला करायचा असल्याचं दीपक देशमुख यांनी सांगितला आहे.

