बीड — संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या चौकशी अहवालावर ‘ॲक्शन टेकन रिपोर्ट’ अर्थात कृती आराखडा (एटीआर) तयार करणाऱ्या समितीत बदल करण्यात आला आहे. सहसचिव व्यंकटेश भट यांच्या जागी आता सहसचिव सुग्रीव धपाटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची न्यायालयात सुनावणी सुरू असून ‘ॲक्शन टेकन रिपोर्ट’ समितीमध्ये सरकारने बदल केला आहे. 9डिसेंबर 2024 रोजी झाल्या नंतर 9 जानेवारी रोजी स्थापन करण्यात आलेल्या समितीत सह सचिव व्यंकटेश भट यांचा समावेश होता. मात्र, शासनाने शुक्रवारी काढलेल्या नवीन निर्णयानुसार भट यांच्या जागी आता सह सचिव सुग्रीव धपाटे यांची नियुक्ती करण्यात आली असून, यामुळे प्रशासकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.हत्या प्रकरणात वाल्मीक कराड मुख्य आरोपी आहे. सध्या तो तुरुंगात आहे. न्यायमूर्ती ताहलियानी समितीच्या अहवालाची छाननी करण्यासाठी गृह खात्याच्या अपर मुख्य सचिवांच्या नेतृत्वात ही उच्चस्तरीय समिती कार्यरत आहे. या बदलामुळे तपासाला गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
समितीचा अहवाल लवकरच विधिमंडळात सादर केलाच जाण्याची शक्यता आहे. हत्याप्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई आणि भविष्यातील उपाययोजनांचा आराखडा ही समिती तयार करणार आहे. या प्रकरणात त्वरित न्याय मिळावा यासाठी महत्वाचे पाऊल उचलले आहे, अशी भावना धनंजय देशमुख यांनी व्यक्त केल्या.
दरम्यान उच्चस्तरीय समिती अपर मुख्य सचिव (गृह) यांच्या अध्यक्षतेखाली काम करत असून यामध्ये प्रधान सचिव (विशेष) आणि अपर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) यांसारख्या बड्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. न्यायमूर्ती एम. एल. ताहलियानी समितीने सादर केलेल्या अहवालातील निष्कर्षांची सखोल छाननी करणे, हे या समितीचे मुख्य उद्दिष्ट आहे. संतोष देशमुख यांच्या मृत्यूशी संबंधित अनेक गंभीर बाबी या अहवालात नमूद करण्यात आल्याचे समजते, ज्यावर आता ही नवीन समिती आपले मत मांडणार आहे. ही समिती जो काही अहवाल सादर करणार आहे, त्याचे आगामी विधिमंडळाच्या अधिवेशनात पडसाद उमटण्याची शक्यता आहे.सह सचिव स्तरावरील या बदलामुळे आता अहवालाच्या छाननीमध्ये नेमके काय नवीन मुद्दे समोर येतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

