नवी दिल्ली –अमेरिका आणि भारत यांच्यात नुकताच मोठा व्यापार करार झाला.यावरून आता लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. व्यापार करार म्हणजे, भारतीय शेतकऱ्यांशी केलेला ‘विश्वासघात’ असल्याचं गांधींनी पोस्टमध्ये म्हटलं आहे .
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एपिस्टीन फाईल वरून तसेच नरवणे यांच्या पुस्तकावरून लोकसभेत सरकारला घेरले. त्यातच अमेरिकेसोबत झालेल्या व्यापार करारावरून शेतकरी देशोधडीला लागणार असल्याचं आक्रमकपणे मांडत आहेत.सोशल मीडियावर एक लांबलचक पोस्ट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 5 प्रश्न विचारले आहेत आणि सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे.
राहुल गांधींचे 5 प्रश्न
१. डीडीजी आयातीचा नेमका अर्थ काय? भारतीय गुरांना जीएम अमेरिकन मक्यापासून बनवलेले डिस्टिलर धान्य खायला दिले जाणार का? यामुळे आपली दुग्ध उत्पादने अमेरिकन कृषी उद्योगावर अवलंबून राहणार नाहीत का?
२. जर आपण जीएम सोया तेलाच्या आयातीला परवानगी दिली, तर मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थानमधील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे काय होणार? ते किमतींचा हा धक्का कसा सहन करतील?
३. जेव्हा आपण “अतिरिक्त उत्पादने” म्हणता, तेव्हा त्यात कशाचा समावेश होतो? हा कालांतराने डाळी आणि इतर पिके अमेरिकन आयातीसाठी खुले करण्याचा संकेत आहे का?
४. बिगर-व्यापारी अडथळे (नॉन ट्रेड बॅरियर) हटवण्याचा अर्थ काय? भविष्यात भारतावर जीएम पिकांवरील आपली भूमिका शिथील करण्यासाठी, खरेदी कमकुवत करण्यासाठी किंवा एमएसपी आणि बोनस कमी करण्यासाठी दबाव टाकण्यात येईल का?
५. हा दरवाजा एकदा खुला झाला की, दरवर्षी तो आणखी उघडण्यापासून आपण कसे रोखणार? हे रोखले जाईल का, की प्रत्येक करारात हळूहळू आणखी पिकांचा यात समावेश होईल?
शेतकऱ्यांना स्पष्टिकरण मिळायला हव –
या प्रश्नांव्यतिरिक्त, “शेतकऱ्यांना स्पष्टीकरण मिळायला हवे. ही केवळ आजची बाब नाही, हे भविष्याशी संबंधित आहे, असे म्हणत, आपण दुसऱ्या देशाला भारताच्या कृषी उद्योगावर दीर्घकालीन नियंत्रण मिळवू देत आहोत का? असा प्रश्नही राहुल गांधी यांनी उपस्तित केला.



