नवी दिल्ली — शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाची सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. शुक्रवारी 23 जानेवारीपासून ही सुनावणी होणार आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाचे याबाबतची अंतिम सुनावणी आजपासुन सर्वोच्च न्यायलायत सुरु होणार होती.
सुनावणी सुरु होण्यापूर्वीच पुढची तारीख मिळाली आहे. येत्या 23 जानेवारीपासून सुनावणी सुरु होणार आहे, विशेष म्हणजे 23 जानेवारी रोजी शिवसेना स्थापन करणारे बाळासाहेब ठाकरे यांची जयंती असून हे त्यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी सुनावणीला सुरुवात होऊन जन्मशताब्दी वर्षात तरी पक्ष आणि चिन्ह कोणाचे याचा निर्णय होणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.
शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या नाव आणि चिन्हाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार होती. आज अंतिम सुनावणी घेऊन पुढील दोन-तीन दिवसांमध्ये निर्णय येण्याची शक्यता होती. मात्र आज पुन्हा एकदा सुनावणी पुढे ढकलण्यात आली. 21 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता सुनावणी घेतली जाईल असे आज कोर्टाकडून सांगण्यात आले.
अंतिम सुनावणीसाठी पाच तासांचा वेळ उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या वकिलांना देण्यात येणार होता. मात्र आज सॉलिसिटर जनरल यांना दुसऱ्या एका प्रकरणात सुनावण्यासाठी जावे लागणार असल्यामुळे त्यांनी वेळ वाढवून मागितला. त्यावर कोर्टाने दोन्ही पक्षकारांची मते जाणून घेतली आणि शुक्रवारी 23 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता सुनावणी घेण्याचे ठरले आहे.
बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेला शिवसेना पक्ष आणि त्यांचे धनुष्यबाण चिन्ह निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिले आहे. विधिमंडळातील त्यांच्या आमदारांच्या संख्येच्या आधारे आयोगाने त्यांना पक्ष आणि चिन्ह बहाल केले. हाच निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कायम ठेवत विधिमंडळातही शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच असल्याचा निवाडा दिला. निवडणूक आयोगाच्या निर्णयाला उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. साधारण साडेतीन वर्षांपासून हा खटला सुरु आहे. दरम्यानच्या काळात लोकसभा निवडणूक झाली. 2019 च्या विधानसभेचा कार्यकाळ संपला, त्यामुळे शिंदेंसह त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांवरील अपात्रतेचा खटला निवाड्याविनाच राहिला. मात्र शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे कोणाचे या खटल्याला फक्त तारखा मिळत आहेत. दरम्यानच्या काळात सर्वोच्च न्यायालयात चार सरन्यायाधीश येऊन गेले. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या पीठासमोर हा खटला आहे. त्यांचा एक वर्षाचा कार्यकाळ आहे. तर यंदाचे वर्ष हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यांच्या जयंतीदिनी खटल्याच्या सुनावणीला सुरुवात होऊन याच वर्षात हा निकाल लागेल अशी आपेक्षा व्यक्त केली जात आहे.

