बीड — “विवेक”च हरवलेल्या जिल्हा प्रशासनाचा “गाढव गोंधळ” अन् इव्हेंट चा सुकाळातून पालकमंत्र्यांचा पाठीवरून हात फिरवून घेण्याची स्टंटबाजी होत असली तरी वास्तव चित्र मात्र भीषण बनू लागले आहे. हरित बीड अभियानाच्या नावाखाली जिल्हाधिकाऱ्यांनी कागदी घोडे नाचवून इंडियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये वृक्ष लागवडीची नोंद करून घेतली. त्यातली किती झाड आज जगली आहेत हा मोठा प्रश्नच आहे. म्हणून कारागृह अधीक्षकांनी देखील कर्तबगारीचा टेंभा लावला. एकीकडे गणेश विसर्जनाची धामधूम सुरू असताना दुसरीकडे जिल्हा कारागृहातील मोठमोठ्या झाडांची गरज नसताना कत्तल करून ती नजर चुकवून लंपास करण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर मात्र अधिकाऱ्या विरोधात संतप्त भावना निर्माण होऊ लागल्या आहेत.

जिल्हा प्रशासनाचे कामकाज विवेकाने होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र इव्हेंट ची कीड बीड जिल्ह्याला पोखरू लागली आहे. वृक्ष लागवडीच्या रेकॉर्डची स्टंटबाजी महिन्याच्या आतच नागडी झाली. कागदी घोडे नाचले असले तरी लावलेली झाड जगली नसल्याने तो घोडे नाच ऐवजी गाढवाचा गोंधळ असल्याच चित्र निर्माण झालं.”विवेक”च हरवला की गोंधळ कशाचा होतोय याचा सारासार विचारच केला जात नाही. हे कमी की काय म्हणून कारागृह परिसरातील झाडांची कत्तल करण्यात आली. ही बाब जनतेच्या लक्षात आली नाही. कारण कारागृह परिसर वर्जित क्षेत्र म्हणून मानलं जातं. पण गणेश विसर्जनाच्या धामधुमीत प्रशासनासह जनता असताना नेमका याचाच फायदा उचलत कारागृह प्रशासन असेल किंवा वृक्षतोड करणारा असेल यांनी संगणमताने लाकडाचे ट्रक भरून लंपास करण्याचा प्रयत्न केला. ही बाब वृक्षप्रेमींच्या लक्षात येताच त्यांनी हे ट्रक पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2024 मध्ये “एक पेड मां के नाम” मोहीम सुरू केली. या मोहिमेला कारागृह प्रशासनाने हरताळ फासली तर जिल्हाधिकाऱ्यांनी इव्हेंटची स्टंटबाजी केली. हे खरं जरी असलं तरी पंतप्रधानांची मोहीम म्हणून का होईना तिचा मान राखून प्रशासकीय कार्यालय परिसरात वृक्ष लागवड होणं गरजेचं होतं.
मात्र शासकीय कार्यालयातच वृक्षतोड होत असेल तर हे दुर्दैव आणि गंभीर आहे. जिल्ह्यात जंगल क्षेत्राची घनता केवळ २.५ टक्के असून पर्यावरण संतुलनासाठी आवश्यक असलेली ३३ टक्के घनता गाठणे दूरचे स्वप्न ठरत आहे. जिल्हा कारागृह प्रशासनातील अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.याच्याच निषेधार्थ उद्या सोमवारी जिल्हा कारागृह कार्यालयासमोर लक्ष्यवेधी आंदोलन करण्यात येणार असून प्रशासनाने तातडीने संबंधितांवर कारवाई न केल्यास आंदोलन उग्र होईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे यांनी दिला आहे.

